India Gateवर आता उभारला जाणार सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा; वादानंतर PM Modiची घोषणा

अमर जवान ज्योतीवरून राजकारण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे.

Statue of Subhash Chandra Bose to be installed at India Gate, says PM Narendra Modi

देशाची राजधानी दिल्लीमधील (Delhi) इंडिया गेटवर (India Gate) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्यदिव्य पुतळा (Netaji Subhas Chandra Bose Statue) उभारला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंती निमित्ताने होलोग्राम पुतळ्याचे अनावरण मोदी स्वतः करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान अमर जवान ज्योतीवरून राजकारण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी ट्वीट करून म्हणाले की, ‘संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करत आहे. याचवेळी मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, ग्रेनाईटपासून बनवलेला सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा इंडिया गेटवर उभारला जाणार आहे. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिथे होलोग्राम पुतळा असणार आहे. मी नेताजींच्या जयंती २३ जानेवारी रोजी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार आहे.’

गेल्या ५० वर्षांपासून जी अमर जवान ज्योत कधी विझली नाही, ती स्थलांतरित करण्याचा निर्णय मोदी सरकारने काल, गुरुवारी घेतला. आज अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे ठेवण्यात येणार आहे. यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शहीद सैनिकांचा हा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसने नेते राहुल गांधी आज ट्वीट करून म्हणाले की, ‘आपल्या वीर जवानांसाठी जी अमर ज्योत जळाली होती, ती आज विझली जाणार आहे, ही खूप दुःखत बाब आहे. काही लोकं देशप्रेम आणि बलिदान हे समजत नाहीत. ठिक आहे, काही हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत पुन्हा एकदा पेटवू.’


हेही वाचा – Amar Jawan Jyoti: शहीदांच्या स्मरणार्थ ५ दशकांपासून प्रज्वलित अमर जवान ज्योतिचा राष्ट्रीय युद्ध स्मारकात समावेश होणार