(Stock Market Crash) मुंबई : चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, आज शुक्रवारी, शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक उणे अंकांवर उघडले. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे बाजारावर दबाव आला. नव्या टॅरिफसंदर्भातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाल्याचे दिसत आहे. सकाळी 10 वाजता बीएसई निर्देशांक 73,602 अंकांवर आला. त्यावेळी निर्देशांकाने 1000 अंकांची (1.34%) घसरण नोंदवली होती. तर, दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास निर्देशांकात 1209.45 अंकांची (1.64%) घट झाली होती. राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टी देखील 273 अंकांनी (1.21%) घसरून 22,271 अंकांवर आला होता. या घसरणीमुळे, बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 7.16 लाख कोटी रुपयांनी घटून 385.94 लाख कोटी रुपयांवर आला होता. (The SENSEX tumbled by more than a thousand points)
शेअर बाजार निर्देशांकात सलग पाचव्या महिन्यांत घसरण झाली आहे. 1996नंतर पहिल्यांदाच सलग पाच महिन्यांत शेअर बाजार घसरला आहे. चिप तयार करणारी कंपनी एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये अमेरिकन बाजारात घसरण झाल्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी इंडेक्सचे शेअर्स चार टक्क्यांनी घसरले. पर्सिस्टंट सिस्टम्स, टेक महिंद्रा आणि एमफेसिस या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. एकूणच, आयटी कंपन्यांसाठी दिवस चांगला नव्हता. निफ्टी ऑटो इंडेक्स देखील दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवत उघडला होता. बँकिंग, मेटल, फार्मा, कन्झ्युमर ड्युरेबल्स तसेच तेल आणि वायू क्षेत्रांचे निर्देशांक देखील एक ते दोन टक्क्यांनी घसरले होते. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात घसरण दिसून आली.
हेही वाचा – CM Fadnavis on Yogesh Kadam : जरा सांभाळून बोला, फडणवीसांचा योगेश कदमांना अनुभवाचा सल्ला
शेअर बाजारात आज, शुक्रवारी झालेल्या घसरणीची अनेक कारणे आहेत. आर्थिक वाढीची मंदावलेली गती, उत्पन्नावरील परिणाम, ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होणारा विक्रीचा मारा यामुळे निर्देशांक सप्टेंबरच्या अखेरच्या उच्चांकावरून सुमारे 14 टक्क्यांनी खाली आला. त्याचबरोबर, शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर होणाऱ्या डिसेंबर तिमाहीच्या जीडीपी आकडेवारीवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. अर्थतज्ज्ञांच्या एका सर्वेक्षणानुसार, या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊ शकते.
बहुतांश आशियाई बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद झाले. एमएससीआय एशिया एक्स-जपान (MSCI Asia Ex-Japan) निर्देशांक 1.21 टक्के घसरला. अमेरिकन बाजारात चिप निर्माता कंपनी एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर ही घसरण झाली आहे. एनव्हीडियाच्या उत्पन्नाच्या अहवालावर गुंतवणूकदारांनी निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्याने तंत्रज्ञान समभागांवर आणखी दबाव आला. यामुळे एआय-चलित समभागांची विक्री झाली. निफ्टीच्या आयटी निर्देशांक 3.2 टक्क्यांनी घसरला. तर पर्सिस्टंट सिस्टम्स, टेक महिंद्रा आणि एमफॅसिस हे सर्वाधिक साडेचार टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा – EPF : मोठी बातमी! सीबीटीने भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराबाबत घेतला निर्णय