नवी दिल्ली : चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपनएआय या कंपनीचा माजी कर्मचारी आणि भारतीय अमेरिकन संशोधक सुचिर बालाजी यांच्या मृत्यूप्रकरण वादाचा विषय बनला आहे. कारण सुचिर यांचा मृतदेह त्यांच्या सॅन फ्रान्सिस्को येथील घरात आढळून आल्यानंतर ही आत्महत्या असल्याचे सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी सांगितले होते. परंतु, ही आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सुचिर यांची आई पोर्णिमा रामराव यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची FBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. पोर्णिमा रामराव यांनी याबाबत X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या या पोस्टला टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क कमेंट करत मोठे विधान केले आहे. (Suchir Balaji Death case his mom Demand for FBI enquiry but Elon musk said)
भारतीय-अमेरिकन संशोधक सुचिर बालाजी यांचा मृतदेह ते वास्तव्यास असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमधील बुकानन स्ट्रीट अपार्टमेंटमधील घरात आढळून आला होता. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयानेही सदर मृत्यू आत्महत्या असल्याचे सांगितले. मात्र पौर्णिमा रामाराव यांनी आता एफबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “सुचिरच्या घरात तोडफोड आणि बाथरुममध्ये झटापटीच्या खुणा दिसत आहेत. बाथरुममध्ये रक्ताचे डाग दिसून येत असून तिथे त्याला मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसते. मात्र पोलिसांनी त्याच्या मृत्यूला आत्महत्या दाखवून आमच्यावर अन्याय केला आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरातील पोलीस आम्हाला न्याय मिळण्यापासून रोखू शकत नाही, मी या प्रकरणाची एफबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करते.”
पोर्णिमा रामराव यांच्या या पोस्टवर एलन मस्क यांनी कमेंट करत म्हटले आहे की, “ही आत्महत्या वाटत नाही.” परंतु, एलन मस्क यांच्या या पोस्टमुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मस्क यांनीच मदत करावी, अशी विनंती पोर्णिमा रामराव यांनी केली आहे. तर सुचिर बालाजी यांचे वडील बालाजी राममूर्ती यांनी त्यांच्या मुलासाठी कॅलिफोर्नियातील मिलपिटास येथे आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत म्हटले होते की, 22 नोव्हेंबरला त्यांचे सुचिर यांच्याशी बोलने झाले होते आणि त्यांच्याशी बोलणारे ते शेवटचे व्यक्ती होते.
या प्रकरणातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, सुचिर बालाजी यांनी एका मुलाखतीत ओपनएआयचे बिझनेस मॉडेल स्थिर नसल्याचे म्हटले होते. कंपनीने आपला प्रोग्राम विकसित करण्यासाठी ऑनलाइन डेटा कॉपी केल्याचा आणि अमेरिकेचे कॉपीराइट नियम तोडल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांनी लोकांना लवकरात लवकर कंपनी सोडण्यासचे आवाहनही केले होते. या भारतीय वंशाच्या तांत्रिक तज्ञाने कंपनीत जवळपास चार वर्षे घालवल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनी सोडली होती.