Corona:’हे लाजिरवाणं आहे’, सुनिल छेत्री झाला उद्विग्न, मागितली माफी!

कोरोना व्हायरसचा जन्म आणि फैलाव झालेल्या चीनी लोकांसारखे दिसतात म्हणून फक्त पूर्वेकडच्या राज्यांमधल्या लोकांना देशाच्या इतर भागामध्ये वाळीत टाकल्याची वागणूक दिली जात आहे, यावर भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान सुनील छेत्रीने उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

sunil chhetri on racism against north east people
सुनिल छेत्री झाला उद्विग्न, मागितली माफी!

देशात कोरोनाचं संकट आता हळूहळू हातपाय पसरू लागलं असताना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजारांच्या वर गेली आहे. तर मृतांचा आकडा देखील ५० च्या वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशवासियांनी एकत्रपणे पण घरातच राहून या संकटाचा सामना करण्यासाठी एकजूट दाखवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून स्थानिक पोलिसांपर्यंत सगळ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, एकजूट दाखवण्याऐवजी एकमेकांचा तिरस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार भारतात घडत आहे. कोरोना व्हायरसचा जन्म आणि प्रारंभीचा फैलाव चीनमध्ये झाला होता. पण फक्त चीनी व्यक्तींसारखे दिसतात, म्हणून भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमधल्या लोकांना त्रास देण्याचे, त्यांना वाळीत टाकण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान सुनील छेत्रीने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे.

काय म्हणाला सुनील?

नॉर्थइस्टमधल्या काही तरुणांना मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी वंशवादाचा सामना करावा लागत आहे. त्यांना त्रास दिला जात आहे. फक्त ते कोरोनाचा जन्म झाला त्या चीनी लोकांसारखे दिसतात म्हणून. हे लाजिरवाणं आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही हे करायला नको. समजा तुम्ही जर त्यांच्या जागी असते, तुमच्यासारख्या दिसणाऱ्या लोकांमध्ये, तुम्ही राहणाऱ्या ठिकाणी या व्हायरसचा जन्म झाला असता आणि इतरांनी तुम्हाला वाळीत टाकलं असतं, जर सगळा देश तुमच्याविरोधात गेला असता, तर? हा मूर्खपणा आहे. असं करू नका. आम्ही फुटबॉलपटू वंशवादाच्या विरोधात आहोत. आपल्या देशाच्या वैविध्यावर आम्हाला अभिमान आहे. आणि हे असे प्रकार काहीच लोकं करत आहेत. आमच्या देशवासियांवर आम्हाला अभिमान आहे. पण जे कुणी लोकं हे करत आहेत, त्यांनी असं करू नये’, असं सुनील छेत्री म्हणाला आहे.

मी माफी मागतो…

दरम्यान, या प्रकाराबद्दल सुनील छेत्रीने स्वत: सगळ्या देशवासियांच्या वतीने पूर्वेकडच्या राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची माफी मागितली आहे. ‘सगळ्या देशाकडून मला त्या सगळ्यांची माफी मागायची आहे, ज्यांना ते फक्त चीनींसारखे दिसतात, त्यामुळे त्रास सहन करावा लागतोय. काही लोकांनी हे केलं आहे. आम्ही त्यासाठी माफी मागत आहोत. मी माफी मागतोय. हे असं तुमच्यासोबत पुन्हा कधीच होऊ नये’, असं तो म्हणाला.


CoronaVirus – हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या महिलेवर बहिष्कार!