नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी ही पुढील तीन आठवड्यांसाठी ढकलली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज कोणतेही कामकाज झाले नाही. तीन आठवड्यासाठी सुनावणी पुढे ढकलली आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका केली होती.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, जे. बी पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. या खंडपीठाने तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ, असे म्हटले आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णय बदलावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील याचिका सुरू असतानाच ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. यानंतर आज पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली. पण सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलली आहे.
ठाकरे गटाने याचिकेत नेमके काय म्हटले
ठाकरे गटाने याचिकेत दावा केला की, निवडणूक आयोगाने दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्रता पाळण्यात चूक केली आहे. निवडणूक चिन्ह आदेशानुसारची कार्यवाही वेगवेगळ्या क्षेत्रात चालते आणि आमदारांची अपात्रता ही राजकीय पक्षाचे सदस्यत्व संपुष्टात आणण्यावर आधारित नाही. शिवसेनेत फूट पडली असे मानून निवडणूक आयोगाने चूक केली, असा आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा – Shiv Sena : शिवसेना नाव, पक्षचिन्हावरील तातडीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, ठाकरे गटाला पुन्हा धक्का
प्रदीर्घ सुनावणीनंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय
दरम्यान, एकनाथ शिंदेसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दावा केला होता. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.