सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होणार चार भाषांमध्ये, सरन्यायाधीशांनी दिली माहिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणाऱ्या प्रत्येक प्रकरणाचे निकाल इंग्रजीत दिले जातात. 99.9 टक्के नागरिकांना ते समजत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता चार भाषांमध्ये भाषांतरित केले जाणार आहेत. यामध्ये हिंदी, गुजराती, उडिया आणि तमीळ या चार भाषांचा समावेश आहे, अशी माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या ऑनलाइन ई-निरीक्षण सॉफ्टवेअरचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान हे कायदेशीर व्यवस्थेतील एक शक्तिशाली उपकरण बनले आहे. यामुळे न्याय प्रशासनाची कार्यक्षमता, पोहोच आणि अचूकता यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. कायदा किंवा तंत्रज्ञानातील नावीन्य हे संबंधितांना कितपत उपयोगी पडते त्यावर तसेच त्याचा वापर करणाऱ्यांकडून येणाऱ्या महत्त्वपूर्ण अभिप्रायावर कोणत्याही उपक्रमाचे यश अवलंबून असते.

हेही वाचा – लखीमपूर खिरी हिंसाप्रकरणात आशिष मिश्राला सशर्त जामीन मंजूर, उत्तर प्रदेश सोडण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा चार भाषांमध्ये भाषांतर होणे, ही एक सुरुवात आहे. अनुवादाचे काम न्यायमूर्ती अभय ओका यांच्या अध्यक्षतेखालील समिती करत आहे, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले की, आता प्रत्येक उच्च न्यायालयात दोन न्यायाधीशांची एक समिती असली पाहिजे, त्यापैकी एक न्यायाधीश त्याच्या व्यापक अनुभवामुळे जिल्हा न्यायव्यवस्थेतून निवडलेला न्यायाधीश असावा. त्यापैकी बहुतेकांनी त्या भाषांमध्ये लिखित निवाडे दिले आहेत, असा तो असावा, असे आमचे ध्येय आहे. अनुवादकांव्यतिरिक्त, उच्च न्यायालये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे मशीनद्वारे केलेले भाषांतराची पडताळणी करण्यासाठी आपले निवृत्त न्यायिक अधिकारी देखील नियुक्त करतील, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

आम्ही प्रक्रियेत आहोत… एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यासाठी आम्ही आता एक टीम तयार करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.