नवी दिल्ली : “माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी संविधान आणि देशाला हानी पोहोचवली आहे.” असा दावा करत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी, ‘भाजपची सत्ता जिथे असते, तिथे हिंदू मुस्लीम दंगली होतात आणि सामाजिक सौहार्दता धोक्यात येते,’ असे मतदेखील व्यक्त केले. त्याच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. तसेच, अश्रू अनावर झालेल्या दवे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Supreme court lawyers Dushyant Dave on ex CJI Dhananjay Chandrachud)
हेही वाचा : Election 2024 : ईव्हीएम मुळे निवडणूक आयोग येणार अडचणीत; 25 उमेदवारांनी उचलले असे पाऊल
एका प्रसिद्ध वृत्तसमूहाशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी अनेक दावे केले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “1991च्या प्रार्थना कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी जी प्रार्थनास्थळे जशी होती तशीच ठेवण्याचा कायदा आहे. पण, सर्वोच्च न्यायालयात तुम्ही काही शैक्षणिक प्रयोग करत आहात का? धार्मिक सौहार्दतेचा हा गंभीर मुद्दा आहे.” असा शब्दात त्यांनी टीका केली. ‘उत्तर प्रदेशच्या संभल येथे उफाळलेल्या धार्मिक हिंसाचारात 4 निष्पाप लोकांचे जीव गेले, त्यासाठी न्यायपालिका जबाबदारी नाही का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानांची देशभरात चर्चा रंगली आहे.
पुढे दुष्यंत दवे म्हणाले की, “धार्मिक हिंसाचारामुळे दोन समुदाय कायमचे विभागले जात असून लोकांचे जीव जात आहेत. ही जखम कधीही न भरुन येणारी आहे. ज्याठिकाणी भाजपचे राज्य आहे, त्याठिकाणी अशा घटना घडत आहेत. मग ते उत्तर प्रदेश असो, राजस्थान.” असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. तसेच ते पुढे म्हणाले की, “माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशाला आणि संविधानाला मोठी हानी पोहोचवली आहे.” असा गंभीर आरोप त्यांनी या मुलाखतीमध्ये केला. “देशात अनेक कामे असून ती कामे करणे, भाग आहेत. देशातील 140 कोटी लोकांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला समाजिक शांती प्रस्थापित करायची असून गरिबांना दारिद्र्यातून बाहेर काढायचे आहे,” असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.