नवी दिल्ली : हुंडाबळीच्या खोट्या तक्रारी करत महिलांनी, विशेषतः पत्नींनी कायद्याचा गैरफायदा घेऊ नये, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महिलांना फटकारले आहे. (supreme court made statement for wives that cruelty law should not be used for personal vendetta against husbands)
पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी त्रास देत खोटा गुन्हा दाखल केल्याने त्रस्त झालेल्या बंगळुरूतील अतुल सुभाष याने 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. यावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
महिलांनी कायद्याचा गैरफायदा घेऊ नये, असे सांगतानाच हुंडाबळीच्या प्रकरणात कायद्याचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी न्यायालयाने देखील काळजी घ्यायला हवी. तसेच पती आणि त्याच्या नातेवाईकांना फसवण्याची प्रवृत्ती असेल तर ती ओळखून या निर्दोष परिवाराला होणाऱ्या त्रासापासून वाचवले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा – Atul Subhash Suicide : अतुल सुभाषचे वकील म्हणतात, आदेश चुकीचा असला तरी…
बंगळुरूतील एका खासगी कंपनीत काम करणारा 34 वर्षीय AI इंजीनिअर अतुल सुभाष यांनी 9 डिसेंबरला घरीच आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी 24 पानांची सुसाइड नोट आणि 90 मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
या व्हिडीओमध्ये अतुल सुभाष याने आपली पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच समाजाच्या सर्व स्तरातून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. महिलांसाठी प्रत्येक गोष्टीत हिरिरीने रस्त्यावर उतरणारा समाज या गोष्टीतही पुढे येईल का, असा प्रश्नही अनेकांनी विचारला.
नेमके प्रकरण काय?
2019 मध्ये अतुल याचे लग्न झाले. लग्नानंतर दोनच वर्षांनी त्याच्या पत्नीने त्याच्यावर हुंडाबळीसह अनेक आरोप केले. यासोबतच, पत्नीने त्याच्याकडून पोटगीपोटी 3 कोटी रुपये मागितले. तसेच मुलाला देखील अतुलपासून लांब केले. लग्नानंतर अतुलच्या पत्नीच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. मात्र, या प्रकरणाचा आरोपही अतुलवरच टाकण्यात आला. यासोबतच, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपये मागितल्याचा आरोपही अतुलने सुसाइड नोटमध्ये केला आहे.
हेही वाचा – Bangalore Case : 24 पानांची सुसाईड नोट अन्…; पत्नीच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरचा गळफास
एआय इंजीनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्ये प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 108 आणि 3 (5) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar