घरताज्या घडामोडीRBIला सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं, बिटकॉईन्सची बंदी हटवली!

RBIला सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं, बिटकॉईन्सची बंदी हटवली!

Subscribe

देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आरबीआयने क्रिप्टोकरन्सीवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.

एप्रिल २०१८पासून देशामध्ये बिटकॉईन्स या क्रिप्टो करन्सीवर म्हणजेच आभासी चलनावर बंदी घालण्यात आली होती. देशाची सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही बंदी घातली होती. मात्र, ती बंदी आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या बंदीविरोधात मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये खंडपीठाने आरबीआयला सुनावत ही क्रिप्टोकरन्सीवरची बंदी उठवली आहे. ‘आरबीआयला अशा प्रकारे क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालता येणार नाही’, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता देशांतर्गत व्यवहारांमध्ये पुन्हा एकदा बिटकॉईन्स दिसण्याची शक्यता आहे.

बिटकॉईनमुळे रुपयाला धोका?

गेल्या वर्षी आरबीआयने बिटकॉईन्सवर बंदी घालण्याअगोदर या करन्सीच्या माध्यमातून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमावला होता. मात्र, त्याचं वाढतं प्रस्थ देशांतर्गत चलन असलेल्या रुपयासाठी धोकादायक ठरू शकतं या विचाराने आरबीआयने बिटकॉईन्ससारख्या क्रिप्टो करन्सीवर बंदी आणली. तसेच, बंदीनंतर देखील कुणी या करन्सीमध्ये व्यवहार केला, तर त्यातून होणाऱ्या नुकसानासाठी बँक जबाबदार राहणार नाही, असं देखील आरबीआयने बजावलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या करन्सीचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय आहे क्रिप्टो करन्सी?

क्रिप्टो करन्सी म्हणजे आपण रोजच्या व्यवहारात वापरत असलेल्या कोणत्याही चलनाप्रमाणेच असते. पण ती ऑनलाईन पद्धतीनेच वापरता येते. ती हाताळता येत नाही. एखाद्या शेअरप्रमाणेच बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टो करन्सीचे व्यवहार चालतात. सुरुवातीला ऑनलाईन अकाऊंट सुरू केल्यानंतर त्यापुढचे सगळे व्यवहार याच माध्यमातून होतात. देशातल्या अनेक बड्या कंपन्यांनी देखील बिटकॉईनमध्ये व्यवहार करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. तुमच्याकडे जर बिटकॉईन करन्सी असेल आणि तुम्ही खरेदी करत असलेल्या व्यावसायिकाकडे ही करन्सी चालत असेल, तर तुम्ही रुपयाऐवजी बिटकॉईनमध्ये पैसे चुकते करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -