नवी दिल्ली – महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने अडचणीत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीतील वाळू उपसा, औष्णिक केंद्रातील राख उचलण्याचा घोटाळा, परळीतील गुन्हेगारीवरुन भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून निशाणा साधला जात आहे. दमानियांनी आज धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या 275 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला. असे चहुबाजूंने धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल होत आहे. आता त्यात दिल्लीतूनही चौकशीचा ससेमिरा मंत्री मुंडेंच्या मागे लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (मंगळवार) संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांना माहिती आहे का? असेल तर या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश केंद्र सरकार देणार का? असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना केला. खासदार सुळे यांच्या प्रश्नाला शिवराजसिहं चौहान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आदेश दिले जातील असे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारने पीकविमा घोटाळा चौकशीचे आदेश दिले तर बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर चौहान म्हणाले, मला तुमच्याकडूनच कळाले
शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात पीकविमा घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा 5 हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आपणास याबद्दल माहित होती का? आणि या घोटाळ्याचे चौकशीचे आदेश आपण देणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
केंद्रीय कृषीमंत्र्यांचे चौकशीचे आश्वासन
खासदार सुळेंच्या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री चौहान म्हणाले, “महाराष्ट्रात असा काही घोटाळा झाला आहे याची माहिती मला आताच खासदार सुळेंकडूनच कळाले आहे. त्या कधी म्हणतात 500 कोटी आणि कधी 5000 कोटी. अशा जुमेलाबीजने गोष्टी चालत नाही,” असे म्हणत खासदार सुळेंच्या आरोपातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कृषीमंत्री पुढे म्हणाले की, आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती कटीबद्ध आहे. जर असा काही घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्र सरकारने देखील पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा सुरु केली आहे. त्यांनी पीकविमा संबंधीत 80:110 चे मॉडेल लागू केले आहे. पुन्हा एकदा सभागृहाच्या माध्यमातून देशाच्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो की चौकशी केली जाईल. चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्याला सोडणार नाही. असे आश्वासन शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे… pic.twitter.com/CmwrUpf0V8
— Supriya Sule (@supriya_sule) February 4, 2025
हेही वाचा : Dhananjay Munde : दमानियांची पत्रकार परिषद संपताच धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला; काय निर्णय घेणार