घरताज्या घडामोडीसूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर नवा ग्रीन हायवे, सॅटेलाईट सिस्टमद्वारे टोल वसुली

सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर नवा ग्रीन हायवे, सॅटेलाईट सिस्टमद्वारे टोल वसुली

Subscribe

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा, टोल नाक्यांविना प्रवास होणार शक्य

उत्तर भारतातून राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीसाठी देशात आणखी एक ग्रीन हायवे तयार केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि.७) केली. हा हायवे सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर असा असेल.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे जेएनपीटीपर्यंत

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसचे काम साधारण ३५ ते ४० टक्के पूर्ण झाले आहे. त्याच्या भूसंपादनाचा प्रश्नही सुटणार आहे. या हायवेला जेएनपीटीपर्यंत नेण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, त्यासाठी आणखी १२ ते १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या निर्णयामुळे पोर्टच्या वाहतुकीचा प्रश्नही सुटेल.

- Advertisement -

देहू-पंढरपूर-आळंदी ठरेल आदर्श मार्ग

देहू ते पंढरपूर ते आळंदी या मार्गाकडे आम्ही सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने पाहतो आहोत. म्हणूनच त्याची रचनादेखील अत्यंत वेगळी राहणार आहे. या रस्त्याच्या सहापैकी तीन टप्प्यांचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने, या मार्गाच्या दुतर्फा कोणते वृक्ष लावावेत, फलक कसे असतील याचाही बारकाईने विचार करण्यात आला आहे. सिमेंट काँक्रिटच्या चार-चार लेनचा हा मार्ग असेल. राज्य सरकारने जागा दिल्यास पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबते, त्या-त्या ठिकाणी मोठे सभागृह, स्वच्छतागृह बांधण्याचा विचार आहे. अनेक भाविक हे पालखीत अनवाणी येत असतात. त्यांचा विचार करून स्वतंत्र पादचारी मार्गावर ज्या टाईल्स बसवल्या जातील, त्यात लॉन्स लावले जाईल. जेणेकरुन या भाविकांना चालणे सुसह्य होईल. या मार्गाचे काम प्राधान्याने होईल.

टोल नाक्यांविना होणार टोलवसूली

सध्या ७५ टक्क्यांहून अधिक वाहनांना फास्ट टॅग लावण्यात आला आहे. मात्र, भविष्यात प्रत्येक वाहनाला जीपीएसद्वारे उपग्रहाशी लिंक करण्याचा विचार आहे. जेणेकरुन एखादे वाहन कोणत्या मार्गाने टोल असलेल्या मार्गावर आले आणि कुठून बाहेर पडले, हे समजेल. या वाहनाने जेवढे अंतर रस्त्याचा वापर केला असेल तेवढाच टोल त्यांना द्यावा लागेल. हा टोल संबंधित वाहनमालकाच्या खात्यातून आपोआप वसूल होईल. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात टोलनाकेविरहित विनाथांबा प्रवास शक्य होईल. पुढील दोन वर्षांत हे आधुनिक तंत्रज्ञान येईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -