गुजरातमध्ये बनावट तूप बनवणाऱ्या कंपनीवर पोलिसांची मोठी कारवाई, १३ लाखांचा माल जप्त

गुजरातमध्ये बनावट तूप बनवणाऱ्या कंपनीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी जवळपास १३ लाखांचा माल जप्त केला आहे. गरम केलेल्या पामतेलात अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर करून तूप तयार करण्यात येत होतं. या कंपनीचा गुजरातमधील सूरत पोलिसांनी मोठा भांडाफोड केला असून त्यांनी १३ लाखांचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे संपुर्ण सूरतमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये बनावट तूप तयार केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरातील मांकणा परिसरात छापा टाकला. त्यावेळी कोणतंही लेबल नसलेल्या बनावट तूपाचे ६९ डबे पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. तसेच केमिकल्स आणि इतर साहित्यही आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ज्या कंपनीच्या नावानं बनावट तूप विकत होते, त्या कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे.


हेही वाचा : राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला मोठ्या गुन्ह्यातून दिलासा; 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला कोर्टाची स्थगिती