sushant singh case-मुंबई पोलिसांवर टीका करणारे DGP गुप्तेश्वर पांडे झाले किर्तनकार

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभारणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभारणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण ही चर्चा राजकीय नसून त्यांच्या देवमार्गाला लागण्याबद्दल आहे. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पांडे यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. तसेच सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हीची लायकीही त्यांनी काढल्याने पांडे चांगलेच चर्चेत आले होते. पण आता कुठल्याही राजकीय पक्षाची वाट न धरता त्यांनी परमार्थाची कास धरत अयोध्येत कथाकिर्तन सुरू केल्याने सर्वत्र आश्चर्यं व्यक्त केले जात आहे. एवढेच नाही तर मी कधीही सुशांतची हत्या झाल्याचे म्हटले नव्हते असे सांगत पांडे त्यांनी सुशांत प्रकरणातून हात झटकले आहेत.

सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे करत हा तपास बिहार पोलिसांकडे देण्याची विनंती सुशांतच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. पांडे यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यादरम्यान मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप पांडे यांच्याकडून करण्यात आला होता.

तसेच सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हीची लायकीही त्यांनी काढल्याने वाद निर्माण झाला होता. पण आता मात्र त्यांनी ‘त्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली असून माफीही मागितली आहे. इंग्रजीत लायकी या शब्दाचा अर्थ उंची असा होता. पण त्यावेळी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेतल्याचे पांडे यांनी म्हटले’. तसेच सुशांतची हत्या झाली असेही मी म्हटले नसल्याचे पांडे यांनी सांगितले आहे.

पांडे यांना राजकारणात रस असल्याने त्यांनी दोन वेळा स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. असं त्यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच निवडणुक लढवण्याची इ्चछा होती पण मला कोणी तिकीटच दिलं नाही. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करण्याचा चॅप्टरच बंद केल्याचेही ते म्हणाले आहेत . दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण जेव्हा घडले तेव्हा बिहारमध्ये निवडणुका येऊ घातल्या होत्या. सुशांत बिहारचा असल्याने राजकीय पक्षांनी हे प्रकऱण लावून धरले होते. याचपार्श्वभूमीवर, पांडेवर याप्रकऱणाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली होती. यातूनच आपला राजकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल असे त्यांनाही वाटतं होते. विरोधकांनी सुशांत आत्महत्याचा मुद्दा तापवला होता. त्यामुळे बिहारी जनतेची मते मिळतील असे त्यांना वाटले होते. यामुळे ते वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. पण पांडे यांना राजकीय पक्षांनी तिकीटच दिले नाही. यामुळे पांडे यांचे राजकारणात जाण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर त्यांनी आता स्वत;ला अध्यात्माकडे वळवले असल्याचे त्यांनीच सांगितले आहे. सध्या अयोध्येत ते भजन किर्तन आणि कथावाचन करत भाविकांना रामायन कथा सांगत आहेत.