(Sushma Andhare on Modi) मुंबई : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुमचा आवडता अभिनेता कोण, असे विचारले असता मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘वाह, क्या सीन हैं…’ असे म्हटले आहे. तथापि, भाजपाने याचा इन्कार करताना व्हिडीओ एडिट करून व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. (Sushma Andhare targets Modi by sharing video)
भजनलाल शर्मा हे आयफा एवॉर्ड कार्यक्रमात गेले होते. तेव्हा पत्रकारांनी, तुमचा आवडता अभिनेता कोण, असे विचारताच भजनलाल शर्मा यांनी लगेचच ‘नरेंद्र मोदी’ यांचे नाव घेतल्याचे दिसते. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ही 13 सेकंदांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. याशिवाय, अनेक काँग्रेस नेत्यांनीही ही व्हिडीओ क्लिप शेअर करून त्यांच्यावर टीका केली.
राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनीही सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘मोदी हे चौकीदार नाहीत तर ‘कलाकार’ आहेत, हे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत. आता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वतः हे मान्य केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसेवक नाहीत तर एक अभिनेते आहेत.’ त्यांनी या पोस्टसोबत ‘actor modi’ हा हॅशटॅगही वापरला आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना, भाजपा नेते तथा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीच हे मान्य केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकनेता नाहीत तर अभिनेता आहेत, अशी खोचक टिप्पणी केली आहे.
भाजपाकडून खुलासा
भाजपाने काँग्रेसचा हा दावा खोडून काढला आहे. भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी आणखी एक 13 सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. एक पत्रकार भजनलाल शर्मा यांना विचारतो की त्यांचा आवडता ‘हीरो’ कोण आहे आणि उत्तरात ते पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतात, असे या व्हिडीओत दिसते. एका कुटुंबासमोर झुकणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी खोटेपणा कायम ठेवला आहे. हा व्हिडीओ एडिट करून बनावट स्क्रिप्ट लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न ते करत असल्याचे लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut on ECI : एका घरात राहतात 43 मुले अन्…, संजय राऊतांची रीपोस्ट चर्चेत