घरदेश-विदेशBREAKING : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

BREAKING : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

Subscribe

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा अखेरचा श्वास घेतला.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. स्वराज यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. सुषमा स्वराज या मागील काही काळापासून आजारी होत्या. त्यामुळेच २०१९मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र ‘मोदी सरकार-२’च्या शपथविधी समारंभात त्या सहभागी झाल्या होत्या. त्या प्रत्यक्ष राजकारणात नसल्या तरी सरकारच्या चांगल्या निर्णयांचे त्यांनी वेळोवेळी ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५-ए कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे त्यांनी ट्विटरवरून स्वागत केले होते. मंगळवारी रात्री आठ वाजता त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. ‘मी हाच दिवस पाहण्यासाठी जिवंत होते’, असे ट्विट त्यांनी केले. रात्री साधारणत: साडेनऊच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी हे तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

- Advertisement -

सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरयाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख स्वयंसेवक होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून येऊन भारतात स्थायिक झाले होते. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले होते. संस्कृत व राज्यशास्त्र विषयातून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. स्वराज यांनी महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले होते. तेथूनच त्या राजकारणात आल्या. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणार्‍या हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० – २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.

२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसर्‍यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नल यांनी स्वराज यांचा भारताच्या ‘आवडत्या राजकारणी’ म्हणून गौरव केला होता.

- Advertisement -

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना ट्विटवर श्रद्धांजली वाहिली आहे…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -