मुलीचा संशयास्पद मृत्यू; आदिवासींचा पोलीस ठाण्यावर हल्ला

मध्यप्रदेशातील महू येथे आदिवासी समाजाच्या एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या आदिवासी समाजाने पोलीस ठाण्याला घेराव घालत हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे आता भाजपकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Suspicious death of girl; Tribal attack on police station

मध्य प्रदेशातील महूमध्ये बुधवारी रात्री मोठा गोंधळ झाला. आदिवासी मुलीच्या संशयास्पद मृत्यूवरून परिसरातील लोकांनी आधी रास्ता रोको केला आणि नंतर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बचावासाठी पोलिसांनी गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच या घटनेमध्ये अनेक पोलीस गंभीर जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी आदिवासींचा पाठलाग केल्यावर त्यांनी पुन्हा जमाव गोळा केला आणि गोफणीने हल्ला केला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने इंदूरहून महू येथे पोलिसांचे एक पथक देखील बोलावण्यात आले आहे. या घटनेत गोळी लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मृत्यूनंतर हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात आला आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तेथील गुंडांनी तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पण विजेचा धक्का लागून मुलीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ज्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी तिचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केले आणि यानंतर जमावाने जवळच्या पोलीस ठाण्यावर हल्ला देखील केला.

या प्रकरणावरून राजकारण तापले असून काँग्रेसचे मध्य प्रदेशातील नेते घटनेच्या ठिकाणी पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीबाबत कृषीमंत्र्यांची भूमिका काय? दानवेंचा सवाल

दरम्यान, ही घटना महूमधील बडगोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमध्ये सहा पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. सदर घटना घडल्यानंतर रात्रभर या परिसरामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी डोंगरगाव चौकीसमोर मुलीचा मृतदेह आणून ठेवला. सुमारे तासभर आदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त लोकांनी पोलीस चौकीवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळात जयसचे कार्यकर्तेही सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.