घरCORONA UPDATEशाळांचे तास, अभ्यासक्रम कमी होणार? मनुष्यबळविकास मंत्र्यांचे संकेत!

शाळांचे तास, अभ्यासक्रम कमी होणार? मनुष्यबळविकास मंत्र्यांचे संकेत!

Subscribe

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, तरीदेखील अनलॉक १.० च्या अंमलबजावणीला देशात सुरुवात झाली आहे. जवळपास अडीच महिने देशात लॉकडाऊन लागू होता. मात्र, आता देशाच्या अर्थव्यवस्थेची थांबलेली चाकं पुन्हा फिरवण्यासाठी काही प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय वर्ष सुरू झालं असून देखील शाळा मात्र सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालक आणि शाळांना देखील काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी शाळांमधला अभ्यासक्रम आणि शाळांचे तास कमी करण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचे संकेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिले आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे शाळा अजूनही बंदच असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांनी राज्य सरकारांच्या शिक्षण सचिवांशी चर्चा करून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या विविध पर्यायांवर चर्चा केली होती. त्यातून पालक, शिक्षकांकडून काही सल्ले देखील केंद्र सरकारपर्यंत पोहोचले आहेत. यानंतर रमेश पोखरियाल यांनी १५ ऑगस्टनंतर त्या वेळची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी ट्वीट करून अभ्यासक्रम आणि तासिका कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

‘सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पालक आणि शिक्षकांकडून आमच्यापर्यंत अनेक सूचना पोहोचल्या आहेत. त्यानंतर आम्ही येत्या शालेय वर्षात शाळांचे तास आणि अभ्यासक्रम कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहोत’, असं पोखरियाल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

देशात आजघडीला दिवसाला जवळपास १० हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा २ लाख ६६ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात घाई केली की काय? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -