दोनदा प्लाझ्मा डोनेट केलाय, गरज पडली तर १० वेळा करेन – तबलिगी

tablighi

खरंतर दिल्लीच्या निजामुद्दीन भागामध्ये तबलिगी जमातच्या मरकजचा कार्यक्रम झाल्यानंतर देशभरात त्यांच्यावर टीका केली गेली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची देखील मागणी केली गेली. या पार्श्वभूमीवर शेकडो तबलिगींना क्वॉरंटाईन देखील करण्यात आलं होतं. मात्र, आता या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तबलिगींपैकी अनेकजण बरे होऊन घरी परतले आहेत. पण असं असलं, तरी आता या तबलिगींनी सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून द्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे शेकडो नागरिक बरे झाल्यानंतर घरी परतले असतानाही प्लाझ्मा थेरेपीसाठी लागणारा प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी फारच थोडे लोकं समोर येत आहेत. तर दुसरीकडे, तबलिगींपैकी अनेकजण प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज हरयाणाच्या झज्जर भागामधल्या एम्स रुग्णालयात एका तबलिगीने दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. अजून गरज लागली, तर १० वेळा प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्धार देखील त्याने बोलून दाखवला आहे.

टेस्ट निगेटिव्ह आली, प्लाझ्मा डोनेट केला!

या तबलिगीचं नाव आहे. अरशद अहमद. अहमद यांनी दिल्लीत झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर झालेल्या चाचण्यांमध्ये इतर अनेक तबलिगींप्रमाणेच अहमद यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांना हरयाणाच्या झज्जर भागामधल्या एम्स रुग्णालयातल्या कोविड १९ वॉर्डमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. उपचारांनंतर त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढली आणि त्यांनी कोरोनाला मात करत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील घेतला. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.

…नमाज घरूनच अदा करू!

मात्र, जेव्हा भारतात प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यासाठी बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन करण्यात आलं, तेव्हा फारच थोड्या बऱ्या झालेल्या रुग्णांनी त्याला प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर अरशद अहमद यांनी स्वत:हून प्लाझ्मा डोनेट करण्याची तयारी दाखवली. एकदा नाही, तर दोनदा त्यांनी प्लाझ्मा डोनेट केला आहे. हरयाणाच्या झज्जर भागामधल्या एम्स रुग्णालयात बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना रुग्णांवरच्या उपचारांसाठी मी आजपर्यंत दोनदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. आणि जर गरज लागली, तर १० वेळा प्लाझ्मा डोनेट करेन. माझं सर्वांना आवाहन आहे की सगळ्यांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करायला हवं. प्रशासनाला आपण सहकार्य करायला हवं. आम्ही रमझानच्या नमाज देखील घरूनच अदा करणार असून मशिदीत जाणार नाही आहोत’. ‘मी महाराष्ट्रातल्या अमरावतीचा रहिवासी आहे. पण इथे रुग्णालयात उपचार घेताना मला घरच्यासारखंच वाटलं. डॉक्टर आणि रुग्णालयातले कर्मचारी खूप चांगली वागणूक देत होते’, असं देखील अहमद म्हणाले.

काही तबलिगींनी एकीकडे रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांशी गैरव्यवहार केल्याची प्रकरणं समोर असताना, त्याच तबलिगी जमातचे सदस्य असलेल्या अरशद अहमद यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.