नवनीत राणांच्या तक्रारीची केंद्राने घेतली दखल, लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने बोलावली बैठक

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केल्यानंतर अटक केली होती.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आली होती. तुरूंगात असताना आपल्याला मागासवर्गीय म्हणून दुय्यम वागणूक दिली. तसेच पाणीही दिले नाही आणि  वाॅशरुमही वापरायला दिले नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, नवनीत राणा यांनी या अन्यायाची तक्रार केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्राची दखल आता केंद्राने घेतली आहे. या मुद्द्यावर लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवनीत राणा यांनाही आपली बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

विशेषाधिकार समितीची बैठक २३ मे रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत खासदार नवनीत राणा मुंबईतील अटक आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातील गैरव्यवहाराबाबत आपली बाजू मांडणार आहेत. नवनीत राणा यांनी 25 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयाला पत्र लिहून या संदर्भात तक्रार केली होती. लोकसभा खासदार असल्याने नवनीत राणा यांची तक्रार लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आली होती. झारखंडमधील भाजप खासदार सुनील कुमार सिंह या १५ सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. सध्या समितीमध्ये एक जागा रिक्त आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केल्यानंतर अटक केली होती. एवढेच नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरावर निदर्शने करून त्यांना घराबाहेर पडू दिले नाही. नवनीत राणा यांनी सभापती आणि लोकसभा सचिवालयाला पत्र पाठवून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे आणि नंतर खार पोलिस ठाण्यात गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

दरम्यान,  राणा दाम्पत्याला न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वकील प्रदीप घरत यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. राणा दाम्पत्याला 18 मे पर्यंत बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.