तालिबानींचा अत्याचार सुरूच; दोन महिलांसह ११ अफगाणींना मारहाण

 

तालिबानः अफागाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी राजवटीने तेथील नागरिकांवर अन्याय व अत्याचार सुरु केला आहे. अशा घटनांचे वृत्त वारंवार समोर आले आहे. तालिबानींनी दोन महिलांसह अकरा अफगाणी नागरिकांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. अफगाणिस्तानातील वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मारहाण झालेल्या सर्वांवर व्यभिचार व अनैतिकतेचा ठपका ठेवण्यात आला होता. आफगाणिस्तानातील बदख्शा प्रांतात या सर्वांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. याआधीही तालिबानच्या दक्षिण हेलमंद भागातील कारागृहात १६ नागरिकांना कोडे मारण्यात आले होते. आतापर्यंत अफगाणिस्तानातील २५० नागरिकांना तालिबानींनी मारहाण केली आहे.

तालिबानी व पाकिस्तान यांच्यामध्येही युद्ध सुरु असते. एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी उभय देश सोडत नाही. गेल्या महिन्यातही या दोन्ही देशांमध्ये एकमेकांनी धमकी देण्याचा कलगीतुरा रंगला होता. पाकिस्तानचे मंत्री राणा सनाउल्लाह यांनी तालिबानला धमकी दिली होती. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) आपल्या देशावरील हल्ले थांबवले नाहीत, तर पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानात घुसून टीटीपीच्या दहशतवाद्यांचा छुपा तळ उद्ध्वस्त करेल, असे म्हटले होते. टीटीपी संघटनेचे दहशतवादी पाकिस्तानात हल्ले करतात आणि अफगाणिस्तानात लपतात, जिथे तालिबान सरकार त्यांना पाठिंबा देते, असा दावा राणा सनाउल्लाह यांनी केला होता.

याला अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी ट्विटरवरून सडेतोड उत्तर दिले. राणा सनाउल्ला! छान! अफगाणिस्तान हा सीरिया, पाकिस्तान किंवा तुर्की नाही. हा अफगाणिस्तान आहे. ही मोठ्या साम्राज्यांची दफनभूमी आहे. आमच्यावर लष्करी हल्ला करण्याचा विचार करू नका, अन्यथा भारतासोबत जशी लज्जास्पद लष्करी शरणागती पत्करावी लागली, तशी स्थिती होईल, असा इशारा त्यांनी ट्वीटवरून दिला होता. त्यासोबत 1971च्या शरणागतीचा एक फोटो त्यांनी शेअर केला होता.

पाकिस्तानी मंत्री राणा सनाउल्लाह यांच्या आरोपानंतर तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही निवेदन जारी केले होते. पाकिस्तान आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. अफगाणिस्तान हे टीटीपी दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान नाही. आम्ही दुर्बळ आहोत, या भ्रमात पाकिस्तानने राहू नये. स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले होते.