Afghanistan: तालिबानने महिला कलाकार असलेल्या मालिकेवर घातली बंदी; अँकरिंग करताना हिजाब घालणे केले बंधनकारक

Taliban in new 'religious guideline' TV channels to stop airing shows with women actors
Afghanistan: तालिबानने महिला कलाकार असलेल्या मालिकेवर घातली बंदी; अँकरिंग करताना हिजाब घालणे केले बंधनकारक

अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर तालिबानने महिलांना काम करण्यास स्वातंत्र्य देणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच जुन्या तालिबानप्रमाणे महिलांवर कोणतेही अत्याचार करणार नाही, असे आताच्या तालिबान सरकारने सांगितले होते. मात्र आता धार्मिक मार्गदर्शक सूचना जारी करत असल्यामुळे तालिबान जुनी परंपरा पुढे सुरू ठेवत असल्याचे दिसत आहे. तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन इस्लामिक धार्मिक मार्गदर्शक सूचना जारी केली. ज्यानुसार देशात टेलिव्हिजन चॅनवरील मालिकेत महिला कलाकार दाखवू शकत नाहीत. एवढेच नाहीतर तालिबानने महिला कलाकारासोबत झालेल्या जुन्या मालिकेचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिला टीव्ही जर्नलिस्टला (पत्रकार) अँकरिंग करताना हिजाब घालण्यास सांगितले आहे.

पैगंबर मोहम्मदसंबंधित चित्रपट, कार्यक्रमांवर तालिबानची बंदी 

दरम्यान तालिबान मंत्रालयाने पैगंबर मोहम्मद संबंधित चित्रपट किंवा कार्यक्रम प्रसारित करू नयेत असे सांगितले आहे. तसेच इस्लामिक आणि अफगाण विरोधात असलेले चित्रपट आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. याबाबत मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहजिरने वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, हे नियम नाही तर धार्मिक मार्गदर्शक सूचना आहेत.

रविवारी उशिरा रात्री सोशल मीडियावर नव्या मार्गदर्शक सूचना तालिबानने जारी केल्या. दरम्यान तालिबानने यापूर्वी महिलांनी महाविद्यालयात काय घालायचे आणि काय घालू नयेत हे नियम लागू केले आहेत. याशिवाय माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आश्वासन देऊनही पत्रकारांचा तालिबान्यांकडून छळ करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली.


हेही वाचा – Lockdown: पुन्हा लॉकडाऊन! नवीन कोरोनाच्या लाटेमुळे देशाचा निर्णय