Afghanistan: तालिबान सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाला सहा देशांना आमंत्रण; भारताला डावललं

taliban invitation to china pakistan russia iran qatar and turkey to participate in government announcement day
Afghanistan: तालिबान सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाला सहा देशांना आमंत्रण; भारताला डावललं

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) सर्व प्रातांवर कब्जा केल्याच्या दाव्यानंतर तालिबानने (Taliban) लवकरच सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबानने सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी चीन (China), पाकिस्तान (Pakistan), रशिया (Russia), इराण (Iran), कतार (Qatar) आणि तुर्की (Turkey) या देशांना आमंत्रण पाठवले आहे. तालिबानच्या आमंत्रणावरून हे स्पष्ट होते की या देशांच्या सरकारने यापूर्वीच संघटनेशी संपर्क साधला आहे. अजूनही भारतासोबत (India) तालिबानचा कोणताही अधिकृत संपर्क झाला नाही आहे.

एक दिवसापूर्वी तालिबान प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिदने सरकार स्थापन करण्याचा कार्यक्रम पुढील आठवड्यापर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, तालिबान एक असे सरकार बनवण्यासाठी संघर्ष करत आहे, जे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सर्वसमावेशक आणि स्वीकार्य असेल. तालिबान येत्या काही दिवसात काबूलमध्ये नवीन सरकार स्थापनेची घोषणा करेल, ज्याचे नेतृत्व संघटनेचे सहसंस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर करतील.

यापूर्वी तालिबानने चीन आपला सर्वात महत्वाचा भागीदार असल्याचे म्हणाले होते. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह योजनेमुळेही चीनला अफगाणिस्तानचा फायदा होणार आहे. यामुळे पेशावर ते काबूल येथे पक्का रस्ता तयार करून चीन मध्य आशियात व्यापार करू शकणार आहे. त्यामुळे सध्या आपल्या फायद्यासाठी चीन तालिबान्यांना पाठिंबा देताना दिसत आहे.

दरम्यान माहितीनुसार, तालिबान्यांनी रातोरात पंजशीरच्या आठ जिल्ह्यावर ताबा मिळवला. त्यानंतर सोमवारी पंजशीरवर ताबा मिळवल्याची अधिकृत घोषणा तालिबान्यांनी केली. त्यानंतर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह पंजशीर सोडून ताजिकिस्तानला गेले आहेत.


हेही वाचा – Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेवरुन भिडले दोन गट; गोळीबारात तालिबानचा प्रमुख जखमी