तालिबानचं भारतावर ड्रग्ज अस्त्र, १०० कोटींच्या मादक पदार्थांची तस्करी

यूपीच्या नोएडात मादक पदार्थ बनवणारा कारखाना उद्ध्वस्त

Drugs

अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर तालिबान्यांनी आता अंमली पदार्थ्यांच्या माध्यमातून भारताला पोखरायला सुरुवात केलीय. तालिबानी शासन आल्यानंतर एकट्या भारतात तब्बल १०० कोटींचे मादक पदार्थ आयात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून, त्यातील केवळ २० कोटींचे मादक पदार्थ जप्त झाले आहेत.

गुजरातमध्ये करण्यात आलेल्या अंमली पदार्थविरोधी कारवाईत ड्रग्ज पुरवणारं रॅकेट संपूर्ण देशभरात पसरल्याचं पुढे आलंय. राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांत अंमली पदार्थांचे २ कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात हाती लागलेल्या धागेदोऱ्यांवरुन तालिबान सरकार चालवण्यासाठी लागणारा महसूल मिळवण्यासाठी हे उद्योग करत असल्याचं सांगितलं जातंय.

टाल्कम पावडर नव्हे ड्रग्ज

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर अलिकडेच एका कारवाईत हजारो कोटींचे मादक पदार्थ पकडण्यात आले. कागदोपत्री या ड्रग्जचा उल्लेख टाल्कम पावडर करण्यात आलेला होता. प्रत्यक्षात मात्र हा सर्व साठा नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ होते. हे ड्रग्ज देशाच्या विविध भागांत पाठवले जाणार होते. या प्रकरणाच्या अधिक तपासात थेट दिल्ली आणि उत्तर प्रदेशात याचे धागेदोरे आढळून आले. त्यानुसार DIR च्या अधिकाऱ्यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दोन ठिकाणी छापे टाकत दोन अफगाणी नागरिकांसह तीन व्यक्तींना, तर नोएडामधून २ अफगाण्यांना अटक केली.

नोएडामध्ये पकडण्यात आलेला साठा आणि गुजरात किनाऱ्यावर झालेली कारवाई, यांत संबंध असण्याची शक्यता वर्तवली जातेय. तपासी संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणांत आतापर्यंत ७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यातील ४ व्यक्ती हे अफगाणी आहेत. दरम्यान, अहमदाबादमधून जप्त करण्यात आलेल्या साठ्याशी संबंधित एका दांपत्याला चेन्नईमधून अटक करण्यात आली. तपासात या व्यक्ती केवळ नामधारी असून, त्यामागील सूत्रधार वेगळेच असल्याचं पुढे आलं आहे. दाम्पत्याला कमिशनपोटी लाखो रुपये दिले जात होते.