काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा; खुद्द ते म्हणतात…

तिरुवनंतरपुरम : महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण जोरात असताना केरळमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शशी थरूर काँग्रेसशी काडीमोड घेण्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असून राष्ट्रावादीचे केरळमधील अध्यक्ष पी. सी. चाको यांनीही तसे संकेत दिले आहेत.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर यांच्याकडे पक्षात दुर्लक्ष होत असल्याची बोलले जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर थरूर यांना मोठ्या निर्णयांपासून दूर ठेवले जात आहे, त्यामुळे थरूर नाराज झाले आहेत, असेही सांगण्यात येते. काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि थरूर एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. खर्गे यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत खर्गे यांना 7 हजार 897, तर थरूर यांना 1 हजार 72 मते मिळाली होती. त्यानंतर थरूर यांना काँग्रेसच्या विविध उच्चस्तरीय समित्यांमध्येही स्थान मिळाले नाही.

या पार्श्वभूमीवर कन्नूरमध्ये राष्ट्रावादीचे केरळमधील अध्यक्ष पी. सी. चाको म्हणाले, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू, असे सांगून ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने त्यांना नाकारले तरी शशी थरूर हे तिरुवनंतपुरमचे खासदार म्हणून कायम राहतील. काँग्रेसकडून थरूर यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, याची मला कल्पना नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची शक्यता शशी थरूर यांनी फेटाळली. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही. पी. सी. चाको यांच्याशी यासंदर्भात माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी देखील त्यांनी नाराज असल्याचे वृत्त फेटाळले होते. मी पक्षातील कोणाच्याही विरोधात बोललो नाही किंवा सूचनांच्या विरोधात काम केले नाही. असे कोणाला वाटत असेल तर पुरावा सादर करावा. मी कोणावरही आरोप वा प्रत्यारोप केलेले नाहीत. माझ्याकडून कोणतीही तक्रार किंवा समस्या नाही. मला सगळ्यांना एकत्र पाहण्यात काही अडचण येत नाही किंवा मला कोणाशीही बोलण्यात अडचण येत नाही, असे शशी थरुर त्यावेळी म्हणाले होते.