(Tamil Nadu Governor’s Walkout) चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी सलग दुसऱ्या वर्षी विधानसभेतून सभात्याग केला. अभिभाषणासाठी ते विधानसभेत आले असताना, संविधान आणि राष्ट्रगीताचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलले, असे राजभवनाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्यावर्षी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आणि राष्ट्रगीत तसेच अभिभाषणातील मुद्द्यावरून राज्यपाल रवी यांनी वॉकआऊट केले होते. (Governor Ravi angry again in Tamil Nadu Assembly)
राज्यपाल कार्यालयाने X या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. राज्यपाल रवी यांनी, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि विधानसभा अध्यक्ष एम अप्पावू यांना राष्ट्रगीताबद्दल वारंवार आवाहन केले, परंतु त्यांनी नकार दिला. राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या पहिल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये त्या-त्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी हे गायले जाते. आज राज्यपाल सभागृहात आले तेव्हा फक्त तमिळ थाई वाझाथू गायले गेले. राज्यपालांनी सभागृहाला त्यांच्या संवैधानिक कर्तव्याची आठवण करून दिली, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – SS UBT on Modi : झोलाछाप फकीर स्वतःच्या झोल्यातून…, ठाकरे गटाची घणाघाती टीका
मुख्यमंत्री आणि अध्यक्षांना राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन राज्यपालांनी वारंवार केले. मात्र त्यांनी बेधडक नकार दिला. ही अतिशय गंभीर बाब आहे. संविधान आणि राष्ट्रगीताच्या अशा अवमानामुळे राज्यपाल संतप्त झाले आणि ते सभागृहातून बाहेर पडले, असेही यात नमूद करण्यात आले आहे. राजभवनने हे अपलोड केलेली पोस्ट आधी हटविली आणि थोड्यावेळाने पुन्हा अपलोड केली.
गेल्यावर्षीही राष्ट्रगीताचाच मुद्दा
तामिळनाडूच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 12 फेब्रुवारी 2024 रोजी सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण होणे अपेक्षित होते. यासाठी राज्य सरकार जे मुद्दे देते, त्यावरच हे भाषण केले जाते. मात्र आपल्या अभिभाषणाच्या आधी आणि नंतर राष्ट्रगीत घेण्याची विनंती फेटाळण्यात आल्याचे सांगून राज्यपाल रवी यांनी आपले भाषण काही मिनिटांत आटोपते घेतले होते. तसेच, राज्य सरकारने तयार केलेल्या अभिभाषणातील अनेक मुद्द्यांशी आपण असहमत असल्याचेही राज्यपाल रवी यांनी यावेळी नमूद केले. भाषण थोडक्यात आटोपते घेऊन राज्यपाल सभागृहातून निघून गेले होते. (Tamil Nadu Governors Walkout: Governor Ravi angry again in Tamil Nadu Assembly)
हेही वाचा – BJP Vs SS UBT : मोदींचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या…, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार