(Tamil Vs Hindi) चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्धच्या लढ्याची धार आणखी तीव्र होत चालली आहे. भाषा युद्धास तयार असलेल्या मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा हिंदी विरोधात तलवार उपसली आहे. यासंदर्भात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसाठी पत्र लिहिले आहे. हिंदीमुळे उत्तर भारतातील 25हून अधिक भाषा नष्ट झाल्या असून, तामिळनाडूवर हिंदी लादण्यास आम्ही विरोध करू, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. तामिळनाडूवर हिंदी भाषा “लादू” देणार नाही, असे सांगत तामिळ आणि तिच्या संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. (MK Stalin claims that more than 25 languages have been destroyed due to Hindi)
केंद्राकडून कथितरीत्या हिंदी भाषा लादली जात असल्याचे लक्षात घेता, आणखी एका भाषा युद्धाची बीजे रोवली जात आहेत का, असे प्रसार माध्यमांनी अलीकडेच विचारले होत. त्याला उत्तर देताना, द्रमुक नेते स्टॅलिन यांनी “हो, नक्कीच,” असे सांगत आम्ही त्यासाठी तयार असल्याचे म्हणाले होते. आज, गुरुवारी त्यांनी याचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील (NEP) त्रिभाषिक सूत्राद्वारे केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. मात्र, केंद्र सरकारने हा आरोप फेटाळून लावला आहे.
हेही वाचा – Yogesh Kadam : स्वारगेट डेपोतील घटनेआधी पोलिसांनी किती वेळा घातली गस्त? मंत्री कदमांची माहिती
कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्टॅलिन म्हणतात की, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या मैथिली, ब्रजभाषा, बुंदेलखंडी आणि अवधी यासारख्या अनेक उत्तर भारतीय भाषा ‘वर्चस्ववादी हिंदीमुळे नष्ट झाल्या आहेत’. वर्चस्ववादी हिंदी-संस्कृत भाषांच्या हस्तक्षेपामुळे 25हून अधिक उत्तर भारतीय स्थानिक भाषा नष्ट झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. जागरूक असल्यानेच, शतकानुशतके चाललेली द्रविड चळवळ आणि विविध चळवळींनी तामिळ तसेच तिच्या संस्कृतीचे रक्षण केले आहे. केंद्र शिक्षण धोरणाद्वारे हिंदी आणि संस्कृत लादण्याचा प्रयत्न करत असल्याने तामिळनाडू एनईपीला विरोध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनईपीनुसार, तिसरी भाषा ही विदेशी भाषा देखील असू शकते, भाजपाच्या दाव्याला एम के स्टॅलिन यांनी उत्तर दिले आहे. त्रिभाषा धोरण कार्यक्रमानुसार, अनेक राज्यांमध्ये फक्त संस्कृतचा प्रचार केला जात आहे. भाजपाशासित राजस्थानमध्ये उर्दू शिक्षकांऐवजी संस्कृत शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे, असे सांगून ते म्हणाले, तामिळनाडूने त्रिभाषा धोरण स्वीकारले तर मातृभाषेकडे दुर्लक्ष केले जाईल आणि भविष्यात संस्कृतीकरण होईल. एनईपीच्या तरतुदींमध्ये असे म्हटले आहे की “संस्कृत व्यतिरिक्त” इतर भारतीय भाषा शाळांमध्ये शिकवल्या जातील आणि तामिळसारख्या इतर भाषा ऑनलाइन शिकवल्या जाऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.
केंद्राने तामिळसारख्या भाषा नष्ट करून संस्कृत लादण्याची योजना आखली आहे, हे यावरून स्पष्ट होते. द्रविड नेते आणि माजी मुख्यमंत्री सी एन अन्नादुराई यांनी दशकांपूर्वी राज्यात द्विभाषिक धोरण लागू करून, हिंदी-संस्कृतद्वारे आर्य संस्कृती लादण्यास आणि तामिळ संस्कृती नष्ट करण्याला वाव नाही, हे दाखवून दिले होते, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा – Pune Rape Case : दुष्कृत्य केल्यावर नराधम गाडे कुठे गेला? शेवटचे लोकेशन आले समोर