(Tamil Vs Hindi) चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्धच्या लढ्याची धार दिवसेंदिवस तीव्रच होत चालली आहे. भाषा युद्धास तयार असलेल्या मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी आता घेतलेल्या एका निर्णयामुळे हा वाद नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. द्रमुक म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारने रुपयाचे चिन्ह ‘₹’ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रुपयाचे चिन्ह काढून टाकत, त्याऐवजी तामिळ अक्षर लिहिण्यात आल्याचे वृत्त आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा मुद्दा संसदेतही तापलेला असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. (Tamil Nadu government removes the rupee symbol)
तामिळनाडू सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह ‘₹’ काढून टाकले आहे. बजेटविषयीच्या प्रतींमध्ये, रुपया हा शब्द तमिळ लिपीतील चिन्ह ரூ ने बदलला आहे, ज्याचा अर्थ देवनागरीमध्ये ‘रु’ असा होतो. हिंदीमध्ये रुपयाचे संक्षिप्त रूप ‘रु.’च आहे. 15 जुलै 2010 रोजी केंद्रात मनमोहन सिंग सरकार असताना आणि पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना भारत सरकारने भारतीय रुपयाचे चिन्ह ‘₹’ स्वीकारले. ₹ चे चिन्ह आयआयटी बॉम्बेचे पदव्युत्तर विद्यार्थी डी. उदय कुमार यांनी डिझाइन केले असून ते मूळचे तामिळनाडूचेच आहेत. उदय कुमार हे द्रमुकचे माजी आमदार एन धर्मलिंगम यांचे पुत्र आहेत. तथापि, रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे, याबद्दल तामिळनाडू सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
हेही वाचा – Penalty to Indian : ऑस्ट्रेलिया विमानतळावर भारतीयाचा महिला कर्मचाऱ्यावर हल्ला, कोर्टाने ठोठावला दंड
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदी आणि संस्कृत विरोधात मोहीम उघडली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील (NEP) त्रिभाषिक सूत्राद्वारे केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. हिंदीमुळे उत्तर भारतातील 25हून अधिक भाषा नष्ट झाल्या असून, तामिळनाडूवर हिंदी लादण्यास आम्ही विरोध करू, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतली आहे.
एक राष्ट्र एक निवडणूक, एक संस्कृती आणि धर्म ही संकल्पना लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाकडून आम्हा दोघांना धोका आहे. फॅसिस्ट भाजपापासून आपली भाषा, संस्कृती आणि साहित्याचे आपल्याला रक्षण करायचे आहे. तामिळनाडूतील द्रविड राजकीय चळवळीसाठी साहित्य आणि भाषा हे दीर्घकाळ आपले आधारस्तंभ ठरले आहेत. दृढ भाषिक आणि सांस्कृतिक अभिमानाची ती ओळख बनली आहे, असे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वीच म्हटले आहे.