घरदेश-विदेशTAMILNADU CRISIS : विधानसभेतून राज्यपालांचे वॉकआऊट; अभिभाषणातले मुद्दे वाचलेच नाहीत

TAMILNADU CRISIS : विधानसभेतून राज्यपालांचे वॉकआऊट; अभिभाषणातले मुद्दे वाचलेच नाहीत

Subscribe

चेन्नई : तामिळनाडूतील स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल आर.एन. रवी यांच्यातील राजकीय मतभेद उघड होत आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली, आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हे सरकार आणि राज्यपाल यांच्यामधील संघर्ष ठळकपणे समोर आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल रवी यांनी राज्य सरकारने सांगितलेल्या मुद्द्यांवर अभिभाषण करण्यास नकार दिला. आणि आपलं भाषण अगदी थोडक्यात आटोपून ते निघून गेले. दरम्यान, विधानसभेत राज्यपालांच्या विरोधातला ठराव सरकारनं संमत केल्यामुळे राजकीय वर्तुळात यावर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगते आहे.

अधिवेशनात नेमकं काय घडलं?

तामिळनाडूच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण होणे अपेक्षित होते. यासाठी राज्य सरकार जे मुद्दे देते, त्यावरच हे भाषण केलं जातं. मात्र आपल्या अभिभाषणाच्या आधी आणि नंतर राष्ट्रगीत घेण्याची विनंती फेटाळण्यात आल्याचं सांगून राज्यपाल रवी यांनी आपलं भाषण काही मिनिटांत आटोपतं घेतलं. राज्य सरकारने तयार केलेल्या अभिभाषणातील अनेक मुद्द्यांशी आपण असहमत असल्याचंही राज्यपाल रवी यांनी यावेळी नमूद केलं. भाषण थोडक्यात आटोपतं घेऊन राज्यपाल सभागृहातून निघून गेले. विशेष म्हणजे, राज्यपाल गेले तेव्हा सरकारमधले एक मंत्री भूमिका मांडत होते. त्यांच्यासमोरून राज्यपाल निघून गेल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच काहीसा प्रकार गेल्या वर्षीच्या तामिळनाडूच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही घडला होता. तेव्हादेखील राज्यपाल रवी अर्थसंकल्पातील काही भाग परस्पर वगळून सभागृहातून निघून गेले होते.

- Advertisement -

गेल्या वर्षी काय घडलं?

राज्य सरकारने तयार केलेल्या अभिभाषणातील काही मुद्दे राज्यपालांनी परस्पर वगळले. भाषण संपताच राज्यपाल सभागृहातून निघून गेले. स्वत: मुख्यमंत्री स्टॅलिन राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना राज्यपाल सभागृहातून निघून गेले. राष्ट्रगीतासाठीही राज्यपाल सभागृहात थांबले नाहीत. यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत राज्यपालांकडून नियमभंग झाल्याचा आरोप केला. तसेच, राज्यपालांनी केलेल्या भाषणाऐवजी राज्य सरकारने सादर केलेलं अभिभाषण सभागृहाच्या पटलावर घेतलं जावं, असा ठरावच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मंजूर करून घेतला.

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध तणावपूर्ण

काही महिन्यांपासून तामिळनाडू राज्य सरकार व राज्यपाल रवी यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. काही मुद्द्यांवर तर हा वाद थेट न्यायालयात गेला आहे. राज्यपाल केंद्र सरकारच्या बाजूने राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा द्रमुकचा आरोप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -