‘टाटा’चा इंडिगो, इंडिका मॉडेल्सना टाटा!

टाटा इंडिगो, टाटा इंडिका

तुम्ही जर इंडिगो किंवा इंडिका गाडी घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा! तुमची ही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण, टाटा मोटर्सने या दोन्ही गाड्यांच्या मॉडेलचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारची कमी झालेली विक्री आणि वाढती स्पर्धा हे यामागील प्रमुख कारण आहे.

जुन्या गाड्यांचे काय होणार?

तुमच्याकडे जर यापैकी कोणतीही गाडी असेल तर, तुम्ही अजिबात काळजी करू नका! कारण, जुन्या गाड्यांना सेवा पुरवण्याचा अर्थात त्यांना सर्विस देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीने जरी इंडिगो, इंडिका गाड्यांचे उत्पादन बंद केले असले तरी, शेवटच्या काही स्टॉकचा पुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती एका विक्रेत्याने दिली आहे. ‘एसआयएएम’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०१८ पर्यंत ‘इंडिगो’चे १,७५६ तर ‘इंडिका’चे २,५८३ युनिट्स विकले गेले आहेत. काही वर्षांच्या तुलनेत हा खप अत्यंत कमी आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी भारतीयांच्या पसंतीला उतरलेल्या इंडिगो, इंडिका या दोन्ही गाड्यांना टाटा करण्याचा निर्णय टाटा मोटर्सने घेतला आहे.