मुंबई: आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या TCS ने अनेक ठिकाणी आपल्या 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीसनुसार या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांत बदलीच्या ठिकाणावर रुजू व्हावे लागणार आहे. या तारखेपर्यंत कर्मचारी जॉइनिंगच्या ठिकाणी न पोहोचल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीने प्रवास आणि राहण्याचा खर्च कंपनी उचलणार असल्याची माहिती दिली आहे.( TCS sent notice of transfer to over 2000 employees If not present within 15 days.)
कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
NITES ने बिझनेस टुडेला सांगितले की, 180 हून अधिक कर्मचार्यांनी युनियनशी संपर्क साधला आणि कंपनीने पाठवलेल्या या अचानक ईमेलबद्दल नाराजी व्यक्त केली. कंपनीने कोणतीही योग्य माहिती आणि सल्लामसलत न करता असा निर्णय घेतल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आयटी युनियनने तक्रार केली दाखल
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आयटी युनियनने टीसीएसविरोधात कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले की, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची खूप गैरसोय झाली आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या छाटणीबाबतही समस्या निर्माण होऊ शकते.
तणाव आणि चिंता याकडे दुर्लक्ष करणारी कंपनी
आयटी युनियनचे अध्यक्ष म्हणाले की, टीसीएस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक समस्या, त्रास, तणाव आणि चिंतांकडे दुर्लक्ष करत आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना नाहक अडचणीत टाकून त्यांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे. मंत्रालयाला योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना नारळ
गेल्या काही काळापासून आयटी क्षेत्राची स्थिती फारशी चांगली नाही. हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत TCS चा अट्रिशन रेट 21.3 टक्के होता.
(हेही वाचा: मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये आज मतदान; ‘या’ जागांवर नजर, अनेक दिग्गजांची विश्वासार्हता पणाला )