घरदेश-विदेशचहा विक्रेत्याच्या मुलीची उंच भरारी! इंडियन एअर फोर्समध्ये झालं सिलेक्शन!

चहा विक्रेत्याच्या मुलीची उंच भरारी! इंडियन एअर फोर्समध्ये झालं सिलेक्शन!

Subscribe

मध्यप्रदेशची आणखी एक कन्या घेणार गगन भरारी. आंचल गंगवालची इंडियन एअरफोर्सची परिक्षा पास झाली असून लवकरच ती लढाऊ विमान चालवणार आहे.

मध्यप्रदेशच्या एका छोट्याशा शहरात राहाणाऱ्या चहा विक्रेत्याच्या मुलीने गरुड झेप घेतली आहे. सुरेश गंगवाल यांची मुलगी आंचल गंगवाल इंडियन एअरफोर्सची परीक्षा पास झाली आहे. लहानपणापासून उराशी बाळगलेले आंचलचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण संपल्यानंतर आंचलला लढाऊ विमान चालवण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

चहावाल्याची मुलगी आकाशामध्ये घेणार झेप

आंचलचे वडील सुरेश गंगवाल यांचा मध्यप्रदेशच्या नीमच बस स्टँडजवळ चहाचा स्टॉल आहे. त्यांची मुलगी आंचल गंगावाल हिचे लहानपणापासून आकाशामध्ये झेप घेण्याचे स्वप्न होते. २४ वर्षाच्या आंचल गंगवाल हिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. या मेहनतीचे फळ आंचलला मिळाले असून लवकरच ती एअरफोर्सच्या फ्लाइंग ब्रांचमध्ये रुजू होणार आहे. त्यानंतर आंचल लढाऊ विमान चालवणार आहे.

२२ जागांसाठी झाली होती परीक्षा

इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ब्रांचसाठी २२ पदांची भरती निघाली होती. देशभरातून लाखो उमेदवारांनी यासाठी अर्ज भरला होता. पास झालेल्या उमेदवारांमध्ये ५ मुलींचा समावेश आहे. या परीक्षेमध्ये आंचल गंगवाल मध्यप्रदेशमधून पास झालेली एकमेव मुलगी आहे. आंचलने १२वी पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. ती जेव्हा १२ वीला होती त्यावेळी उत्तराखंडमध्ये पूर आला होता. त्यावेळी सशस्त्र दलाकडून ज्या पद्धतीन रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. ते पाहून आंचल प्रभावित झाली. आणि तिने एअरफोर्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी तिच्या घरची परिस्थिती बिकट होती.

ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आंचलच्या यशामुळे सर्व लोकं माझ्या नामदेव टी स्टॉलला ओळखतात. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. माझ्या स्टॉलवर येऊन सर्व जण मला शुभेच्छा देतात. आंचलने खूप मेहनत करुन यश मिळवले आहे.

सुरेश गंगवाल, आंचलचे वडील

- Advertisement -

आंचलला सहाव्या वेळी मिळाले यश

अथक परिश्रमानंतर आंचलला यश मिळाले आहे. आंचललने याआधी ५ वेळा एसएसबीची परिक्षा दिली होती. त्यामध्ये तिला यश मिळाले नाही. सहाव्या वेळी परीक्षा दिल्यानंतर ती यशस्वी झाली. एसएसबीची परीक्षा ५ दिवस चालते. ज्यामध्ये उमेदवाराला स्क्रीनिंग, सामान्य ज्ञान या परीक्षेसोबत अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो. देशाची पहिली लढाऊ विमान पायलट अवनी चतुर्वेदी ही देखील मध्यप्रदेशचीच आहे. अवनी चुतुर्वेदीने फेब्रुवारी २०१८ मध्ये मिग-२१ हे लडाऊ विमान एकटीने चालवत इतिहास रचला.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -