दिल्लीत लैंगिक अत्याचार केले, आता बांगलादेशमधून करतोय ब्लॅकमेल

girl abuse
प्रातिनिधिक छायाचित्र

दिल्ली येथील सरिता विहार या परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर बांगलादेशला पळून गेलेला आरोपी आता तिथून या मुलीला ब्लॅकमेल करत आहे. मुलीने बांगलादेशला यावे यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात आहे. मात्र मुलीने नकार दिल्यानंतर तिचे आपत्तीजनक फोटो आरोपीने फेसबुकवर अपलोड केले. दिल्ली पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे.

काही दिवसांपूर्वी सरिता विहार येथेली परिसरात तीन युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. सरिता विहार पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे. तीनही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र बांगलादेशला पळून गेलेला आरोपी अद्याप हाती लागलेला नाही.

मेहंदी (२७ वर्ष) नामक युवक डिसेंबर महिन्यात बांगलादेशहून भारतात आला होता. आरोपीला ऑस्ट्रेलियाला जायचे होते, त्यामुळे त्याचा व्हिसा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याची १३ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीसोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा उचलत आरोपीने मुलीसोबत अश्लिल वर्तन करत तिचे आपत्तीजनक फोटो काढले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा आरोपी बांगलादेशला निघून गेला. मात्र त्यानतंर तो पीडित मुलीला फोन करुन बांगलादेशला येण्यास सांगू लागला. आपले ऐकले नाही तर तुझे फोटो फेसबुकवर टाकू, अशी धमकीही त्याने दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील मेहंदीने पीडित मुलीच्या फोटोबद्दल सरिता विहारमधील मुलांना माहिती दिली. त्यानंतर येथील तीन मुलांनी देखील पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर मात्र पीडितेने आई-वडीलांना हा प्रकार सांगितला आणि पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी पीडितेची आरोग्य तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसहीत तीन जणांना ताब्यात घेतले. ज्या आयडीवरुन बांगलादेशच्या तरुणाने पीडितेचे फोटो अपलडो केले होते. ते अकाऊंट आता पोलिसांनी डिलीट केले आहे.