घरElection 2023Telangana Election : परिवारवादाच्या भोवऱ्यात सापडले प्रमुख पक्ष, तरीही आरोपांचे सत्र सुरूच

Telangana Election : परिवारवादाच्या भोवऱ्यात सापडले प्रमुख पक्ष, तरीही आरोपांचे सत्र सुरूच

Subscribe

हैदराबाद : तेलंगणासह आता चार राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तिथे प्रचार टिपेला पोहोचला आहे. भाजपाने परिवारवादाच्या निमित्ताने प्रमुख विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे. मात्र, बीआरएसची सत्ता असलेल्या तेलंगणामध्ये परिवारवादाच्या भोवऱ्यात प्रमुख पक्ष सापडल्याचे चित्र आहे. तरीही येथे एकमेकांवर परिवारवादाचा आरोप करण्याचे सत्र सुरूच आहे.

हेही वाचा – ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट… सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री शिंदे

- Advertisement -

या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 नोव्हेंबरला तेलंगणात मतदान होणार आहे. यावेळी एकाच कुटुंबातील अनेक सदस्य (जसे की भाऊ-बहीण किंवा पती-पत्नी) तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही प्रथा जवळपास सर्वच पक्षांमध्ये दिसून येते. विशेषत:, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि विरोधी काँग्रेसमध्ये हे प्रमाण जास्त आहे. घराणेशाहीच्या आरोपांचा सामना करणाऱ्या बीआरएसच्या वतीने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यावेळी गजवेल आणि कामारेड्डीमधून निवडणूक लढवत आहेत. तर, केसीआर यांचा मुलगा आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव पुन्हा सिरसिलामधून निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुतणे तसेच राज्याचे अर्थ आणि आरोग्यमंत्री टी. हरीश राव हे देखील सिद्धीपेट येथून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. रामाराव यांनी यापूर्वी म्हटले होते की, एखाद्या प्रमुख नेत्याच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मुलांनी राजकारणात प्रवेश करणे, यात नवीन काहीच नाही. कारण डॉक्टर आणि अभिनेत्यांची मुले देखील त्यांच्या पालकांचा वारसा सांभाळतात.

काँग्रेसने हुजूरनगर मतदारसंघातून पक्षाचे खासदार एन. उत्तमकुमार रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांची पत्नी एन. पद्मावती सध्याच्या विधानसभा निवडणुकीत कोडाडमधून निवडणूक लढवत आहेत. तर, विद्यमान आमदार मयनामपल्ली हनुमंत राव हे हैदराबादमधील मलकाजगिरी येथून पुन्हा निवडणूक लढवत आहेत, तर त्यांचा मुलगा रोहित राव मेडक मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सरकारने 80 कोटी लोकांना गुलाम बनवले, संजय राऊत यांचे टीकास्त्र

बीआरएसने हनुमंत राव यांना निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, स्वतःला आणि मुलाला तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे लोकसभा सदस्य कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी यांना नलगोंडा मतदारसंघातून पक्षाने तिकीट दिले आहे. तर, त्यांचे भाऊ कोमातिरेड्डी राजगोपाल रेड्डी मुनुगोडे मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. काँग्रेसने आणखी दोन भावांना रिंगणात उतरवले आहे. जी. विवेक यांना चेन्नूरमधून आणि त्यांचा भाऊ जी. विनोद यांना बेल्लमपल्लीतून तिकीट देण्यात आले आहे.

बीआरएसचा काँग्रेसवर निशाणा

जाहीरनाम्यातील ‘एक कुटुंब, एक तिकीट’ या संकल्पनेची अंमलबजावणी न केल्याबद्दल बीआरएसकडून सातत्याने काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. ‘काँग्रेसने जाहीरनामा जारी करताना म्हटले होते की, प्रत्येक कुटुंबात एकच तिकीट मिळेल. तेलंगणात ते या भूमिकेवर ठाम आहेत का? त्यांनी किती कुटुंबांना तिकिटे दिली आहेत? मयनामपल्ली हनुमंत राव आणि त्यांचा मुलगा, उत्तम कुमार रेड्डी आणि त्यांची पत्नी, कोमातीरेड्डी बंधू आणि इतर अनेक…,’ असे टीकास्त्र बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी 10 नोव्हेंबर रोजी सोडले होते. घोषणा लागू करण्याबाबत तुम्ही प्रमाणिक नसाल तर, घोषणाबाजी करण्यात काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी विचारला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -