ईडीच्या रडारवर तेलंगणाच्या कविता, हैदराबादमध्ये भाजपा नेत्यांचे झळकले पोस्टर्स

हैदराबाद : दिल्लीतील राज्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता (K Kavitha) यांची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी तेलंगणात झळकलेल्या अनेक पोस्टर्सद्वारे भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये विविध पक्षांचे नेते दाखवण्यात आले आहेत, ज्यांच्यावर भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही तपास यंत्रणेने छापेमारी केलेली नाही.

पोस्टरच्या माध्यमातून केसीआर यांच्या बीआरएसने (Bharat Rashtra Samithi) भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर कोणताही डाग नसल्याचे तसेच छापेमारीही होत नसल्याचे या पोस्टरवर एका बाजूस दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, बीआरएस आमदार कविता यांना दाखविण्यात आले असून त्यांना स्वच्छ प्रतिमा असल्याचे म्हटले आहे.

पोस्टरवर राणे, सिंधिया, सरमा यांच्यासह अनेक नेते
हैदराबादच्या रस्त्यांवर लावलेल्या पोस्टर्सवर मध्य प्रदेशचे नेते व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्राचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, पश्चिम बंगालचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे फोटो आहेत. ईडी-सीबीआयच्या छाप्यानंतर या सर्व नेत्यांनी इतर पक्षांतून भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांचा कलंक धुतला गेल्याचे पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. तर, कविता यांच्या फोटोला ‘खरा रंग कधीच विटत नाही’ अशी कॅप्शन दिली आहे.

महिला आरक्षण विधेयकाचा आग्रह
संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक सादर करण्याच्या मागणीसाठी कविता यांनी शुक्रवारी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण सुरू केले. शुक्रवारी दिल्लीत होणाऱ्या उपोषणाचे कारण देत त्यांनी तपास यंत्रणेला त्यांची चौकशी शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले.