(Temple-Mosque) नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्राचीन प्रार्थनास्थळांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्या वक्तव्याचे समर्थन केले तर, हिंदू धर्मगुरू आणि संघटनांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, संघाशी संबंधित एका नियतकालिकाने भागवत यांच्या या विधानाशी असहमती दर्शवलेली असतानाच अन्य एका मॅगझिनने त्यांची पाठराखण केली आहे. (Panchjanya magazine supports Mohan Bhagwat’s comment)
गेल्या आठवड्यात आरएसएसशी संलग्न ऑर्गनायझर या नियतकालिकाने सोमनाथ ते संभलपर्यंतची कव्हर स्टोरी प्रकाशित करतानाच मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता आरएसएसशी संबंधित पांचजन्य मॅगझिनमध्ये मोहन भागवत यांचे मत योग्य असल्याचे म्हटले आहे. मशीद-मंदिर वादाच्या पुनरुत्थानावर संघ प्रमुख मोहन भागवत यांची अलीकडील टिप्पणी ही समाजाला या प्रकरणी ‘समजदार भूमिका’ घेण्याचे आवाहन आहे, असे पांचजन्यच्या संपादकीयात म्हटले आहे. तसेच या मुद्द्यावर ‘अनावश्यक वादविवाद आणि दिशाभूल करणारा प्रचार’ करण्यापासून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांची टिप्पणी म्हणजे, देशात पुन्हा निर्माण झालेल्या मंदिर-मस्जिद वादाच्या पार्श्वभूमीवर समाजाने समजूतदारपणाची भूमिका घेण्याचे केलेले आवाहन आहे. शिवाय, त्यांनी या मुद्द्यावर ‘अनावश्यक वादविवाद आणि दिशाभूल करणारा प्रचारा’पासून सावध राहण्याचा इशाराही दिला आहे, असे पांचजन्यच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – Raj Thackeray : मराठी माणूस हा केवळ…, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत ठाकरेंनी व्यक्त केली खंत
सरसंघचालक मोहन भागवत यांनी 19 डिसेंबर रोजी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत ‘भारत: विश्वगुरु’ या विषयावर बोलताना, देशभरात मंदिर-मशीद वादाने पुन्हा डोके वर काढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतर काही लोकांना असे वाटू लागले आहे की ते असे मुद्दे उपस्थित करून ‘हिंदूंचे नेते’ होऊ शकतात, असे सांगतानाच भागवत यांनी, सर्वसमावेशक समाजाचा पुरस्कार केला. आपण एकोप्याने राहू शकतो, हा संदेश भारताने देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते.
मोहन भागवत यांनी मंदिरांबाबत नुकत्याच दिलेल्या वक्तव्यानंतर मीडिया जगतात शब्दयुद्ध सुरू झाले आहे किंवा हे जाणूनबुजून केले जात आहे. स्पष्ट विधानाचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला जात आहे. रोज नवनवीन प्रतिक्रिया येत आहेत आणि या प्रतिक्रिया उत्स्फूर्त सामाजिक मतांऐवजी “सोशल मीडिया तज्ज्ञांनी निर्माण केलेला गोंधळ आणि उन्माद” दर्शवतात, असे ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी 28 डिसेंबरच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
मंदिरे ही हिंदूंची श्रद्धास्थाने आहेत, परंतु त्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे पूर्णपणे अस्वीकार्ह आहे. आजच्या युगात मंदिरांच्या मुद्द्यांवर अनावश्यक वादविवाद आणि भ्रामक प्रचार करणे ही चिंताजनक प्रवृत्ती आहे. सोशल मीडियामुळे याला आणखी हवा दिली जात आहे, असे सांगून हितेश शंकर म्हणतात की, स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणारे काही समाजकंटक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वयंघोषित संरक्षक आणि विचारवंत बनले आहेत. समाजाच्या भावनिक प्रश्नांबाबत जनभावना भडकावणाऱ्या अशा तर्कहीन विचारवंतांपासून दूर राहण्याची गरज आहे. हजारो वर्षांपासून विविधतेत एकतेच्या तत्त्वज्ञानाचा केवळ प्रचारच नव्हे तर, तसे जीवनात आत्मसात केलेल्या सभ्यतेचे आणि संस्कृतीचे नाव म्हणजे भारत आहे.
हेही वाचा – Raj Thackeray : मनसैनिकांनो मनातील खंत बाजूला ठेवा अन्…; ठाकरेंचा कार्यकर्त्यांसाठी नववर्षाचा संकल्प
प्रसारमाध्यमांवर निशाणा
ऐतिहासिक आणि अध्यात्मिक मूल्ये नसलेल्या, परंतु राजकीय स्वार्थाने भरलेल्या ‘काही घटकांनी’ राजकारणातील आपले प्रस्थ वाढविण्यासाठी समाजाला भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गल्लीत आणि परिसरात ‘हिंदू मंदिरे’ वाचवण्याच्या नावाखाली मोठे हिंदू विचारवंत म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे, अशी टीका संपादक हितेश शंकर यांनी कथित हिंदुत्ववादी नेत्यांवर केली आहे. मंदिरांच्या शोधावरून खळबळ निर्माण करणे, हा बहुधा 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि अन्य प्रसारमाध्यमांची भूक भागवणारा जणू एक ‘मसाला’च बनला आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.
ऑर्गनायझरची असहमती
आरएसएसचे नियतकालिक असलेल्या ऑर्गनायझरमध्ये अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लेखात भागवत यांच्या विधानाशी असहमती दर्शविण्यात आली आहे. आपली प्रार्थनास्थळे मुक्त करण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी कोणीही करू शकते. यामध्ये चुकीचे असे काय आहे? हा आपल्या सर्वांना संविधानामुळे मिळालेला अधिकार आहे, असे या लेखात म्हटले आहे. तसेच, सोमनाथ ते संभलपर्यंतच्या लढ्याचा यामध्ये संबंध जोडण्यात आला आहे. संभलमध्ये जिथे एकेकाळी श्री हरिहर मंदिर होते, तिथे जामा मशिद बांधण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला असल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Temple-Mosque: Panchjanya magazine supports Mohan Bhagwat’s comment)
हेही वाचा – Ajit Pawar : “कराड दोषी असेल तर कारवाई होईल, पण धनंजय मुंडेंचा…”, अजितदादांच्या मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं