राजौरी : लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी वाहनावर 4 ते 5 राउंड गोळीबार केला. या हल्ल्यातील जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, लष्कराच्या वाहनांवरील हल्ल्यानंतर दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. (Terrorist attack on army vehicle in Sunderbani area of Rajouri district)
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (26 फेब्रुवारी) दुपारी 1 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथील फहल गावात पाण्याच्या टाकीजवळ झाला. हे गाव सुंदरबनी मल्ला रोडवर वसलेले आहे. या भागातून लष्कराचे एक वाहन जात होते.
दरम्यान, दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी जंगलातूनच वाहनाला लक्ष्य करून अनेक गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, लष्कराच्या जवानांनीही कारवाई केली आहे. संपूर्ण परिसराला वेढा घातला गेला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. नियंत्रण रेषेजवळील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर 4 ते 5 राउंड गोळीबार केला. लष्कराच्या प्रवक्त्यानेही घटनेची माहिती दिली आहे. परंतु अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.
सध्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्याने ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार केल्याची माहिती समोर आली होती. त्यामध्ये तीन पाकिस्तानी लष्करी जवानांचाही समावेश होता.
हेही वाचा – Mahashivratri and Mahakumbh 2025 : पहाटेपासून 41 लाख भाविकांनी केले स्नान, 2 कोटी लोक येण्याची शक्यता