घरदेश-विदेशदहशतवाद्यांचा क्रूरपणा; काश्मीरमध्ये पोलिसाचे अपहरण करून हत्या

दहशतवाद्यांचा क्रूरपणा; काश्मीरमध्ये पोलिसाचे अपहरण करून हत्या

Subscribe

काश्मीरमधील सोपियन जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी जावेद अहमद दार या पोलीस कॉन्स्टेबलचे अपहरण करून हत्या केली. शुक्रवारी सकाळी जावेद यांचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात संतापाचे वातावरण आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा क्रूरपणा सुरूच आहे. जवानांनंतर आता दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे. गुरूवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पोलीस कॉन्स्टेबलचे अपहरण करून हत्या केली आहे. जावेद अहमद दार असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून गुरूवारी त्याचा मृतदेह कुलगाम येथे सापडला आहे. जावेद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गुरूवारी जावेद यांचे सोपियन जिल्ह्यातील कोचडोरा या भागातून अपहरण करण्यात आले. याच ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान जावेद आपल्या घराबाहेरील मेडिकल स्टोअरजवळ उभे असताना दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर लगेचच जावेद यांच्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. पण, रात्री उशिरापर्यंत जावेद याचा शोध काही लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी जावेद यांचा मृतदेह हाती लागला. सध्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात संतापाचे वातावरण असून ‘त्यांना धडा शिकवा’ अशी मागणी होत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी औरंगजेब या जवानाचे अपहरण करून हत्या केली होती.

जवानाचे अपहरण करून हत्या

रमझान निमित्ताने घरी जाणाऱ्या औरंगजेब या जवानाची देखील दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. शिवाय, औरंगजेब यांचा १.१५ मिनिटांचा व्हिडिओ देखील दहशतवाद्यांनी जारी केला होता. यामध्ये दहशतवादी औरंगजेब यांना प्रश्न विचारत होते. औरंगजेब यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली होती. शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी देखील दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानंतर लष्करप्रमुख आणि संरक्षणमंत्र्यांनी औरंगजेब यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते. त्यानंतर आज देखील दहशतवाद्यांनी जावेद अहमद दार यांचे अपहरण करून हत्या केल्याने काश्मीर खोऱ्यामध्ये संतापाचे वातावरण आहे.

- Advertisement -

ऑपरेशन ऑल आऊट

रमझान महिन्यामध्ये लष्कराने शस्त्रसंधी लागू केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या होत्या. पण, रमजान महिना संपताच लष्कराने ‘ऑपरेशन ऑल’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना शोधून काढत ठार केले. त्यानंतर देखील दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. औरंगजेब यांच्या हत्येनंतर आता पोलिस कॉन्स्टेबल जावेद अहमद दार यांची हत्या करण्यात आल्याने काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात संतापाचे वातावरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -