घरदेश-विदेशसावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार

सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आज सोमवारी (ता. २७ मार्च) काँग्रेसच्या डिनर पार्टीवर ठाकरे गटाच्या खासदारांनी बहिष्कार टाकला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी यांच्याकडून सांगण्यात आले. पण यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. कारण आज (ता. २७ मार्च) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या घरी विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे. पण या डिनर पार्टीला ठाकरे यांच्या गटातील एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. ज्यामुळे ठाकरे गट काँग्रेसवर नाराज झाला आहे. ज्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांनी आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा एकही खासदार जाणार नाही, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. तर याच मुद्द्यावरून मालेगावच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची कानउघडणी सुद्धा केली आहे.

- Advertisement -

सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांनी १४ वर्षे अनन्वीत अत्याचार सहन केले आहेत. त्यांचा अपमान आपण सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मालेगावमधील सभेतून सांगितले. तर, दुसरीकडे वीर सावरकर आमच्यासाठी आणि देशासाठी श्रद्धेचा विषय आहेत. अंदमानात १४ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नाही. अशी टीकेला जनता चोख प्रत्युत्तर देऊ शकते. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण वीर सावरकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.

दरम्यान, आता या नव्या मुद्द्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामधील या वादावर काही तोडगा निघणार की भविष्यात याचे काही वेगळे परिणाम पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण याआधी देखील महाविकास आघाडीमध्ये काहीही ठीक नसल्याचे समोर आले होते. तर महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेला काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात होते. ज्यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा महाविकास आघाडीमध्ये फूट पाडतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -