मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हसरे फोटो क्वचितच दिसतात, पण त्यांच्या अचाट वक्तव्यांमुळे करमणूक होते आणि लोक खळखळून हसतात. नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पक्ष कार्यकर्त्यांसमोर मोदी यांनी दोन मुद्दे मांडले. भ्रष्टाचारमुक्त विकासाची यशोगाथा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा हा पहिला मुद्दा. विरोधक चिखलफेकीचे राजकारण करतील. मात्र भाजपाने विकासाचेच राजकारण करावे, असा दुसरा मुद्दा मोदी यांनी मांडला. त्यामुळे देशात अनेकांना हसू फुटले, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – Mumbai : धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव; राहुल शेवाळेंचा ठाकरेंवर निशाणा
भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा हे मोदी सरकारचे सगळ्यात मोठे थोतांड आहे आणि गेल्या दहा वर्षांत मोदी तसेच त्यांच्या लोकांनी जितके चिखलफेकीचे राजकारण केले, तसे इंग्रज काळातही झाले नसेल. मोदी पावलापावलांवर खोटे बोलतात आणि त्या खोटेपणातच स्वतःला गुंतवून ठेवतात, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.
रामाचे मंदिर अयोध्येत उभे राहिले. मोदी यांनी मंदिरात श्रीरामाची राजकीय प्राणप्रतिष्ठा केली, पण रामाचे सत्य वचन काही मोदींच्या अंगात भिनले नाही. मोदी यांच्या सत्तेचा पाया भ्रष्टाचाराच्या टेकूवरच उभा आहे आणि त्याचा मुखवटा रोज गळून पडत आहे, असे सांगून ठाकरे गटाने म्हटले आहे की, ‘निवडणूक रोखे’ म्हणजे इलेक्टोरल बॉण्डस्मधील भाजपचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टानेच उघड केला. उद्योगपती, काळा बाजारवाले, परदेशी कंपन्यांना कंत्राटे देण्याच्या बदल्यात भाजपाच्या तिजोरीत सात हजार कोटी रुपये जमा केले आणि त्याच काळ्या पैशांवर भाजपाला सत्तेची सूज आली. तरीही श्रीमान मोदी भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा लोकांपर्यंत पोहोचविण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे.
हेही वाचा – Loksabha Election 2024 : 96.88 कोटी जनता ठरवणार कोण सत्तेत बसणार
भाजपच्या तिजोरीत सात हजार कोटींचे ‘दान’ देणारे हे नवे कर्ण कोण? याचा खुलासा झाल्याशिवाय मोदी यांनी सार्वजनिक जीवनात वावरू नये. अमेरिका, युरोपमधील एखाद्या राष्ट्रात तेथील पंतप्रधानांनी असा खोटारडेपणा केला असता तर त्यांना राजीनामा देऊन घरीच बसावे लागले असते, पण सुप्रीम कोर्टाने सात हजार कोटींचा घोटाळा पकडूनही मोदी हे पक्षाच्या व्यासपीठावर हारतुरे स्वीकारत आहेत आणि भ्रष्टाचार मुक्तीची प्रवचने झोडत आहेत, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.
हेही वाचा – CM Shinde : 20 हजार संगणक परिचालकांचे मासिक मानधन आता 10 हजार – मुख्यमंत्री शिंदे