(Thackeray Vs BJP) मुंबई : भारतीय जनता पक्षाने लोकांना वाईट सवयी लावून ठेवल्या आणि आता त्याच भाजपाचे नेते लोकांना ‘भिकारी’ म्हणून हिणवत आहेत, हे बरे नाही. भाजपाचे एक नेते तसेच मध्य प्रदेशातील मंत्री प्रल्हाद पटेल म्हणतात, ‘‘सरकारसमोर हात पसरण्याची, भीक मागण्याची सवय लोकांना पडली आहे. नेता आला रे आला की, त्याच्या गळ्यात हार घालायचे आणि मागण्यांचा कागद हातात द्यायचा, ही काही चांगली सवय नाही. अशाने संस्कारी समाज निर्माण होणे कठीण आहे.’’ प्रल्हाद पटेल यांनी जे ज्ञानामृत उधळले आहे, त्यावर भाजपानेच एक चिंतन शिबीर घेण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray criticizes leader who calls people beggars)
जनता सरकारकडे हात पसरत असेल, म्हणजेच भीक मागत असेल तर जनतेवर ही वेळ कोणी आणली? अकरा वर्षांपासून देशावर भारतीय जनता पक्षाचा एकछत्री अंमल आहे आणि ‘सब कुछ मोदी मोदी’चा नारा आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपाचा निवडणुकीतील मंत्र आहे. 2014मध्ये सत्तेत येण्यापूर्वी लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न मोदी यांनीच दाखविले आणि मते मिळवली. शिवाय, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचा वादादेखील त्यांनी केला होता. मात्र यापैकी एकही वादा अकरा वर्षे सलग सत्तेत असलेल्या मोदी सरकारने पूर्ण केला नाही, याकडे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.
हेही वाचा – NCP : संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी मुंडेंचा संबंध नाही, पण…; राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केले निवेदन
लोकांना सरकारसमोर हात पसरण्याची, लाचार होण्याची वेळ आली आहे. आज देशात तासाला दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आपल्या अन्नदात्याची ही अवस्था तर इतरांची काय असणार? असा सवाल करून ठाकरे म्हणतात, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मंत्र्यांचा अहंकार अधूनमधून उफाळून येत असतो. ‘‘सरकारसमोर हात पसरण्याची म्हणजे भीक मागण्याची सवय लोकांना लागली आहे,’’ ही भाजपाचे एक नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी उधळलेली मुक्ताफळे याच अहंकाराचा नमुना आहे. भिक्षेकऱ्यांचे सैन्य उभारून समाज बलवान बनवता येत नाही, असेही मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले खरे, पण हे भिक्षेकरी आणि अंधभक्तांचे सैन्य बनविण्याची फॅक्टरी भारतीय जनता पक्षच आहे.
‘मोफत’, ‘लाचार’ योजनांचे जनकत्व भाजपाकडेच जाते. गौतम अदानी यांच्यासारख्या श्रीमंतांना हात न पसरताही सर्व मिळते आणि एखादा गरीब मागणीपत्र घेऊन सरकार दरबारी जातो तेव्हा तो भिकारी ठरतो. भाजपा राज्यात भ्रष्टाचारी आणि गद्दार दलबदलूंना मानसन्मान आहे. गरीबांनी फक्त मते द्यायची, तीदेखील ठोक भावात, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Ambadas Danve : धनंजय मुंडेंनंतर आता माणिकराव कोकाटेंचा नंबर, दानवेंचा इशारा