(Thackeray Vs Jaishankar) मुंबई : लंडन येथील पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पाकिस्तानविषयी प्रश्न विचारला आणि जयशंकर यांनी ‘संघ’छाप उत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर घेतल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही आणि त्याशिवाय काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही, असे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. जयशंकर हे भारतीय परराष्ट्र सेवेतले एक निवृत्त नोकरशहा आहेत. मोदी यांनी त्यांना सुषमा स्वराज यांच्या जागी परराष्ट्रमंत्री केले, पण जयशंकर म्हणजे डॉ. मनमोहन सिंग नाहीत. मनमोहन सिंग यांनी देशात अर्थक्रांती घडवली तसे क्रांतिकारक काम जयशंकर यांनी परराष्ट्र खात्यात केले नाही, असे टीकास्त्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे. (Thackeray targets Jaishankar regarding PoK)
जयशंकर म्हणतात, ‘‘पाकच्या ताब्यातील काश्मीरचा भूभाग घेऊ.’’ जयशंकर आणि त्यांच्या पक्षाला पाकच्या ताब्यातील काश्मीर घेण्यापासून कोणीच अडवलेले नाही. मोदी यांचे सरकार येऊन दहा वर्षे झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांना काश्मीर ताब्यात घ्यायला हा एवढा काळ पुरेसा आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Vijay Wadettiwar : मराठा विद्या प्रसारक घोटाळा अधिवेशनात गाजणार – विजय वडेट्टीवार
काश्मीर ताब्यात घेऊ आणि अखंड भारत बनवू. त्यासाठी पाकड्यांच्या हद्दीत घुसून त्यांना मारू, अशा गर्जना पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा केल्या. त्या गर्जना शेवटी वल्गनाच ठरल्या. काश्मीरात मोदी यांनी विशेष असे काहीच केले नाही. भारत-पाकिस्तानमधील तणावाचे मुख्य कारण पाकव्याप्त काश्मीर हेच आहे. हा तणाव दूर होण्यासाठी काश्मीरचा प्रश्न निकाली काढावा लागेल, पण काश्मीरचा भूभाग सोडायला कोणी तयार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह काश्मीरात जाऊन भारतीय सैन्यासमोर भाषण करतात. त्यातही ते पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तो परत घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, हेच पालुपद लावत असतात. मोदी-राजनाथ-जयशंकर यांनी एकत्र बसून पाकव्याप्त कश्मीर पुन्हा भारतात घेण्याविषयीचा एक आराखडा आणि कालमर्यादा आखली पाहिजे. पुढच्या दोन वर्षांत आम्ही पाकमध्ये घुसून कश्मीरवर तिरंगा फडकवू, असे जाहीर केले पाहिजे. मोदी ते का करत नाहीत? काश्मीरच्या नावाने आणखी किती काळ नरडी गरम करणार? याप्रश्नी लोकांना मूर्ख बनविण्याचे राजकारण कधीतरी थांबायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Pravin Darekar : मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी प्रवीण दरेकरांनी केली ही घोषणा, वाचा सविस्तर