(Thackeray Vs Modi) मुंबई : गरिबी, अंधश्रद्धा आणि धर्मांधता वाढवून लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवायचे हे सध्याच्या सरकारचे धोरण आहे. गरीब, भिकारी लोक हे अंधश्रद्धाळू आणि धर्मांध बनतात. भाजपाला नेमके तेच हवे. भाजपाच्या धर्म पंडितांनी तसेच धर्म प्रचारकांनी कधी रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य यावर चर्चा केली आहे काय? ते ‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे बोलतात, पण शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या समस्यांवर बोलत नाहीत, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Government’s policy of increasing superstition and religious fanaticism)
देशातील 85 कोटी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिन्याला माणशी दहा किलो धान्य फुकट देतात. ही भीक आहे आणि मोदी यांनी भारत देशातील मोठ्या लोकसंख्येस भिकारी बनवले. पुन्हा राज्याराज्यांत ‘लाडके भाऊ’, ‘लाडक्या बहिणी’ अशा योजनांतून खात्यात पैसे जमा केले जातात. हे सर्व करण्यामागे मते विकत घेणे आणि सत्ता कायम ठेवणे हाच हेतू आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.
भारतातील लोकसंख्या भिकारी तसेच गरीब ठेवल्याचा आणखी एक फायदा म्हणजे या मतदारांना विकत घेता येते. त्यांची मते घाऊक भावात विकत घ्यायची नाहीतर मतदानाच्या आदल्या रात्रीच त्या गरीबांच्या बोटाला शाई लावून मतदानाला न येण्याची किंमत द्यायची. त्यामुळे सरकार गरीबांच्या विकत घेतलेल्या मतांवर निवडून येते आणि ते गरीबांना गरीब ठेवण्याचेच धोरण राबवते. हेच गरीब त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे हात पसरतात तेव्हा भाजपाचे मंत्री तसेच नेते त्यांची ‘भिकारी’ म्हणून हेटाळणी करतात, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Maharashtra’s economy : आता ते अजितदादा कुठे गेले बरं? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा प्रश्न
शेतकऱ्यांनी त्यांच्या मालास न्यूनतम समर्थन मूल्य मागितले आहे. आमच्या मालास योग्य भाव द्या, म्हणजे आम्हाला सरकारपुढे भिकाऱ्यासारखे हात पसरावे लागणार नाहीत, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि ती योग्यच आहे. शेतकरी स्वतः आत्मनिर्भर होऊ पाहत आहे आणि मोदी सरकार त्यांना आपल्या दारातले भिकारी करू पाहत आहे, असेही शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे.
भारत देशाची ही परिस्थिती गंभीर आहे. भारताचा आर्थिक पाया खचलेला आहे आणि देशाचा मनोरा कलंडला आहे. प्रयागराजच्या महाकुंभात 80 कोटी लोकांनी स्नान केले यावर सरकार खूष आहे. यात 75 कोटी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारे, मोदींच्या फुकट धान्य योजनेचा लाभ घेणार लोक आहेत. ते प्रयागराजला चेंगराचेंगरीत मेले तसे दिल्ली रेल्वे स्थानकावरून कुंभाला जाण्याच्या गर्दीतही चिरडून मेले. सरकार म्हणेल, ‘‘चला, दोनेक हजार भिकारी आणि लाभार्थी कमी झाले.’’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – Thackeray Vs BJP : भाजपाने एक चिंतन शिबीर घेण्याची गरज, असे का म्हणाले उद्धव ठाकरे?