पाकिस्तानच्या गोळीबारात ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू

Thane fisherman killed in firing by Pakistan Maritime Security Agency off Gujarat coast
पाकिस्तानच्या गोळीबारात ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू

पाकिस्तानने गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्रात गोळीबार केला आहे. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या कर्मचार्‍यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय नौकेला लक्ष्य करत गोळीबार केला. त्यात ठाण्यातील श्रीधर रमेश चामरे (३०) या मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. अन्य एक जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

द्वारकाचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी म्हणाले की, जलपरी या मासेमारी नौकेवर असलेल्या महाराष्ट्राच्या ठाण्यातील मच्छीमार पीएमएसएच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. बोटीवर सात जण उपस्थित होते, त्यापैकी एकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. मृत मच्छीमार श्रीधर रमेश चामरे (वय ३२) यांचा मृतदेह रविवारी ओखा बंदरात आणण्यात आला. पोरबंदर नवी बंदर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अरबी समुद्रात गुजरातमधील १२ नॉटिकल मैलांपर्यंतच्या घटना त्यांच्या अधिकारक्षेत्रात येतात.

चामरे हे २५ ऑक्टोबर रोजी जलपरी बोटीत सात सदस्यांसह ओखाहून निघाले होते. त्यापैकी पाच गुजरातमधील आणि दोन महाराष्ट्रातील होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले.

यापूर्वी मार्चमध्ये पाकिस्तानने ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली होती आणि त्यांच्या दोन बोटी जप्त केल्या होत्या. फेब्रुवारीमध्येही, पाकिस्तानने १७ भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आणि त्यांच्या तीन बोटी ताब्यात घेतल्या. अरबी समुद्रात स्पष्ट सागरी सीमा नसल्यामुळे पाकिस्तान आणि भारत अनेकदा एकमेकांच्या मच्छीमारांना अटक करतात. तसेच मच्छिमारांकडे त्यांचे नेमके ठिकाण जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाने सुसज्ज नौका नाहीत. नोकरशाही आणि लांबलचक कायदेशीर प्रक्रियेमुळे, मच्छीमारांना सहसा कित्येक महिने आणि काहीवेळा वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागतो.