दिल्लीतील तरुणीचा ‘तो’ अपघात नव्हे, ‘निर्भया’ची पुनरावृत्ती; कुटुंबीयांचा दावा

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील कांजवाला येथे बलेनो कारने एका तरुणीच्या स्कुटीला धडक देऊन तिला खाली पाडले. कारला अडकलेल्या या तरुणीला तब्बल 13 किलोमीटर फरफटत नेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तथापि, हा अपघात नसून ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती आहे, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

थर्टी फर्स्टच्या रात्री नशेत असलेल्या बलेनो कारच्या चालकाने एका तरुणीच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही तरुणी कामावरून घरी जात असल्याचे म्हटले जाते. स्कुटीला धडक दिल्यानंतर कारचालकाने या तरुणीला 13 किलोमीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या व्हिडीओनुसार तरुणीच्या दोन्ही पाय, डोके आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्ण (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल (27) या पाच जणांना अटक केली आहे.

ही घटना ‘निर्भया’सारखेच असल्याचा दावा करून या तरुणीच्या मामाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. माझ्या भाचीसोबत काहीतरी गैरप्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास झाला पाहिजे, जेणेकरून माझ्या भाचीला न्याय मिळेल, असे मामाने म्हटले आहे. तर, पीडित तरुणीच्या आईने देखील अशीच भूमिका मांडली आहे. तिच्याबरोबर काहीतरी ‘चुकीचे’ घडले आहे आणि तिचा अपघातही झाला आहे. तिचा आधीही एक अपघात झाला होता. त्यावेळी तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते. पण यावेळी तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. आम्हाला तिचे शरीरही दाखवले जात नाही, असे सांगत तरुणीच्या आईने सखोल पोलीस चौकशीची मागणी केली.

आरोपी मुले मुर्थल येथून नवीन वर्ष साजरे करून बलेनो कारने परतत होते. तर, पीडित तरुणी पार्ट्यांमध्ये जेवण सर्व्ह करत होती आणि पहाटे तीनच्या सुमारास काम आटोपून स्कूटीवरून घरी परतत होती, असे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे डीसीपी हरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले.

दिल्ली महिला आयोगाकडून दखल
या संपूर्ण घटनेची दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनीही या संपूर्ण प्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे. मद्यधुंद अवस्थेतील काही मुलांच्या कारने एका तरुणीच्या स्कूटीला धडक दिली आणि तिला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे सांगण्यात येते. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मी दिल्ली पोलिसांना हजर राहण्याचे समन्स बजावत आहे. संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.