सुप्रीम कोर्टातील खटल्यांच्या Automatic Listing साठी सरन्यायाधीशांनी केला ‘हा’ उपाय!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सुनावणीसाठी त्याचे लिस्टिंग (Listing) कधी होते, याची प्रतीक्षा याचिकादाराला करावी लागत होती. हे ध्यानी घेऊन नवनियुक्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यासाठी एक वेगळा उपाय केला आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या खटल्यांचे Automatic Listing होईल. तशा सूचनाही त्यांनी निबंधकांना दिल्या आहेत.

न्याययंत्रणेबद्दल महत्त्वाचे बदल करून सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम माजी सरन्यायाधीशांबरोबरच विद्यमान सरन्यायाधीश सुद्धा करत आहेत. योगायोगाने हे दोन्ही आजी-माजी सरन्यायाधीश महाराष्ट्राचे आहेत. घटनापीठाकडे सोपविलेले असे प्रदीर्घ खटले माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी हाती घेतले आणि त्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्यावर भर दिला. एकूण 30 न्यायमूर्ती होते आणि सरन्यायाधीश उदय लळित यांनी पाच जणांचे एक अशी सहा घटनापीठे तयार केली आणि प्रलंबित खटल्यांना गती दिली.

सर्वोच्च न्यायालयात आपला 37 वर्षांचा कार्यकाळ होता. प्रॅक्टिस करत असताना त्यावेळी दोन घटनापीठांना एकाच वेळी दोन प्रकरणांची सुनावणी घेत असल्याचे पाहिले नव्हते. पण मी सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर एकाच वेळी तीन घटनापीठांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी घेतली, असे खुद्द माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी सांगितले. याशिवाय, त्यांच्याच कार्यकाळात न्यायालयीन कामकाजाचे लाइव्ह-स्ट्रिमिंगही सुरू करण्यात आले. माजी सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा होता. पण या काळात 10 हजाराहून अधिक प्रकरणांचा निपटारा केला. याशिवाय फाइलबंद असलेली दोषपूर्ण 13 हजार प्रकरणेही आम्ही निकाली काढील, अशी माहितीही त्यांनी दिली.

आता त्यांचे उत्तराधिकारी आणि विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी शपथ घेतल्यानंतर लगेच गुरुवारी खटल्यांच्या लिस्टिंगबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. शनिवार, सोमवार आणि मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांचे त्याच्या पुढील सोमवारी लिस्टिंग करावे आणि गुरुवार व शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांचे त्याच्या पुढील शुक्रवारी लिस्टिंग करावे, अशी सूचना निबंधकांना दिल्या आहेत. अशा प्रकारे खटल्यांचे Automatic Listing होईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.