अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत नेतृत्व गमावलं; थोरात, अशोक चव्हाण यांनी वाहिली आदरांजली

The demise of ahmed patel lost an experienced, loyal leader says balasaheb thorat ashok chavan

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्य बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत नेतृत्व गमावले असे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

“ज्‍येष्‍ठ नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.”

“खासदार अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून परिचित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या संघटनेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र कधीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. नेहमी व्यापक पक्षहित डोळ्यासमोर ठेवून काम केले.”

“मागील अनेक वर्षांपासून मी अहमद पटेल यांच्याशी संपर्कात होतो. विविध कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व विस्तृत चर्चा होत असत. आपल्या जबाबदारी विषयी त्यांची कटिबद्धता विलक्षण होती. साधेपणा, संयमी व मुद्देसूद संभाषण असे त्यांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहिल,” असे म्हणत अशोक चव्हाण यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.

अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत नेतृत्व गमावले – बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की वयाच्या २६ व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य आणि पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. अनेकवेळा मंत्रीपदाची संधी असताना त्यांनी ती न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे योदगान दिले आहे.

कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. काँग्रेससाठी अहमद पटेल हे कायम निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज असायचे. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते.

गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या कामानिमित्ताने पटेल यांच्याशी गाठीभेटी व चर्चा होत असत. माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पटेल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे थोरात म्हणाले.