घरदेश-विदेशमोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जाची निवडणूक आयोग करणार समीक्षा

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जाची निवडणूक आयोग करणार समीक्षा

Subscribe

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवायचा की नाही, याचा पुनर्विचार निवडणूक आयोग (Election Commission) करत आहे. शरद पवार अध्यक्ष (Sharad Pawar) असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षासाठीची पात्रता पूर्ण करत आहे की नाही, यावर आयोग आज सुनावणी करणार आहे.

एखाद्या राजकीय पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार किंवा विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस ही अट पूर्ण करत आहे की नाही, याची समीक्षा निवडणूक आयोग करणार असल्याचे वृत्त एनडीटीव्ही इंडियाने दिले आहे.
नागालँडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवर विजय मिळवला आहे. याआधी मेघालय आणि केरळातही पक्षाचे आमदार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणूकही लढवली आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी 1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करुन त्यांचे नेतृत्व अमान्य केले. काँग्रेसने शरद पवार यांना पक्षातून निलंबित केले. पवारांनी पी.ए.संगमा, तारिक अन्वर यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationlist Congress Party) स्थापन केला. संगमा आणि अन्वर यांच्या रुपाने राष्ट्रवादीला अनुक्रमे मेघालय आणि बिहारमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करता आलं. राष्ट्रवादीने छोट्या राज्यांची निवड करत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला. नुकत्याच झालेल्या पूर्वोत्तर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत नागालँडमध्ये राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. यानंतर त्यांनी विरोधीपक्षात बसण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

निवडणूक आयोग राष्ट्रीय पक्षांची वेळोवेळी समीक्षा करत असते. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी आयोगासमोर पक्षाची बाजू मांडली. आयोगाने विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहे. प्रफुल्ल पटेल आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.

- Advertisement -

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत दुफळी माजल्यानंतर आयोगाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यानंतर आता आयोगाची नजर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष राष्ट्रवादीवर आहे का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -