कॅलिफॉर्निया : अमेरिकेत पती-पत्नीमधील किरकोळ वादातून एकाचा जीव जाण्यापर्यंत पोहोचला आहे. जेफ्री फर्ग्युसन आणि त्यांची पत्नी शेरिल बाहेर जेवायला गेले होते, तेव्हा अचानक दोघांमध्ये वाद झाला. घरी आल्यानंतर पुन्हा वाद सुरू झाला. यामुळे संतापलेल्या जेफ्रीने मद्यधुंद अवस्थेत पत्नीवर गोळी झाडली. जेफ्री हे कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काऊंटी सुपीरियर कोर्टात न्यायाधीश आहेत.
BREAKING: Forty seven weapons and more than 26,000 rounds of ammunition were seized from the home of a Southern California judge who was charged with murder in the shooting death of his wife, authorities said. https://t.co/zpLkNzaunZ
— The Associated Press (@AP) August 11, 2023
याप्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, ऑरेंज काऊंटीचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी ख्रिस्तोफर अॅलेक्स यांनी कोर्टात सांगितले की, 3 ऑगस्ट रोजी फर्ग्युसन आणि त्याची पत्नी शेरिल घराजवळील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते, तिथे त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी न्यायाधीशांनी आपल्या हाताच्या बोटांनी पत्नीवर बंदूक रोखल्यासारखे केले होते. जेव्हा दोघे घरी परतले तेव्हा 65 वर्षीय शेरिल फर्ग्युसन म्हणाल्या, “तुम्ही माझ्यावर खरी बंदूक का रोखत नाहीत.” त्यावर संतापलेल्या न्यायाधीशांनी खरोखरची पिस्तूल काढून पत्नीवर गोळी झाडली. 911वर कॉल करून आपण पत्नीवर गोळी झाडल्याचे सांगितले, अशी माहिती ख्रिस्तोफर अॅलेक्स यांनी दिली.
हेही वाचा – काठमांडू एअरपोर्टवर चाक झाले लॉक, ट्रॅक्टरच्या मदतीने एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हटविले
त्यानंतर न्यायाधीश जेफ्री फर्ग्युसन यांनी आपल्या कोर्टातील लिपिक आणि बेलीफ यांना “मी नुकतीच माझी पत्नी गमावली आहे” असा संदेश पाठवला. मी माझ्या पत्नीला गोळी मारली असून मी उद्या येणार नाही, कारण मी कोठडीत असेन. मला खूप वाईट वाटत आहे, असे त्यांनी या संदेशात म्हटले असल्याचे ख्रिस्तोफर अॅलेक्स यांनी कोर्टात सांगितले.
ही माहिती मिळताच पोलीस न्यायाधीशांच्या घरी पोहोचले. त्यावेळी महिलेच्या छातीत गोळी लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यांना आढळले. तिथे, डझनभर बंदुका आणि 26,000 गोळ्या होत्या. घराची झडती घेतली असता 47 बंदुका मिळाल्या, त्या सर्वांचा परवाना होता. पोलिसांनी सांगितले की, फर्ग्युसन (72) यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्या तोंडाला दारूचा खूप वास येत होता.
हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालय इमारतीचाही होणार विस्तार; सरन्यायाधीशांकडून मोठी घोषणा
सन 2015पासून न्यायाधीश असलेले फर्ग्युसन यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पण त्यावेळी त्यांनी पत्नीची हत्या केल्याचा इन्कार केला. न्यायालयाने फर्ग्युसन यांची जामिनावर सुटका केली असून त्याला दारू न पिण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहायचे आहे. हा गुन्हा नसून अनावधानाने घडले असल्याचे फर्ग्युसन यांचे वकील पॉल मेयर यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.