‘द केरळ स्टोरी…’, महिलांचे धर्मांतर केल्याचे पुरावे द्या; थरूर यांचे थेट आव्हान

नवी दिल्ली : निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला आरएसएस आणि भाजपाचा विधानसभा निवडणुकीसाठी प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. ट्रेलर संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही वक्तव्य केले आहे की, महिलांचे धर्मांतर केल्याचे पुरावे देण्यासाठी आव्हान केले आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. कारण चित्रपटात दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२,००० हिंदू आणि ख्रिश्चन महिलांचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आले आहे. यामुळे वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यांनी असेही म्हटले की, हा भाजपाचा अजेंडा आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही ‘द केरळ स्टोरी’ ट्रेलर प्रकरणी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “केरळमधील ३२,००० महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्या सर्वांसाठी एक संधी, दावा सिंद्ध करा किंवा पैसा कमवा. आव्हान स्वीकारण्यास तयार होणार नाही कारण कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत? याबरोबरच थरूर यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये ‘केरळमधील ३२००० महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये न्या.’ यावेळी त्यांनी ‘नॉट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, त्यांनी दोन दिवसांनी म्हणजे ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करावे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल थोडक्यात
सुदीप्तो सेन यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केरळमधील सुमारे ३२००० बेपत्ता महिलांची कथा सांगणारा आहे. या महिलांचे धर्मांतर करून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात आले. यानंतर या महिलांचा भारत व जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये वापर करण्यात आला. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावाही दिग्दर्शकांनी केला आहे.