काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधी कुटुंबातून नाही! अशोक गहलोत निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षा होत्या. मात्र, आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अध्यक्षपदाची कमान दुसऱ्या खांद्यावर देण्याच्या हेतूने पक्षांतर्गत अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीला अशोक गहलोत उभे राहणार आहेत. त्यांनीच याबाबत आज अधिकृत माहिती दिली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शशी थरूर, मनीष तिवारी आदी नेते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी अशी मागणी शशी थरुर यांनी केली होती. तसंच, मीही निवडणूक लढवणार असल्याची माहिती शशी थरूर यांनी दिली होती. त्यामुळे अशोक गहलोत यांनी निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केल्याने आता शशी थरुरही उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना अशोक गहलोत म्हणाले की, “राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावं अशी आम्ही मागणी केली होती. मात्र, त्यांना आता अध्यक्ष व्हायचं नाहीय. तसंच, पक्षाचा पुढचा अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसावा, अशीही भूमिका राहुल गांधी यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी लवकरच नामांकन दाखल करणार आहे.” दरम्यान, निवडणुकीसाठी उतरण्याआधी अशोक गहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करणार आहेत. त्यामुळे राजस्थानची जबाबदारी आता कोणावर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

शशी थरुरही रिंगणात उतरणार

काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी येत्या 17 ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शशी थरूर यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. पक्षांतर्गत लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आपण ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर सोनिया गांधी यांनी मंजुरी देत ही निवडणूक कोणीही लढवू शकतो, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.